पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीसोबत बळजबरीनं शारीरिक संबंध; युवकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:55 IST2025-04-02T15:55:23+5:302025-04-02T15:55:49+5:30
आरोपीने फिर्यादी तरुणीस आपण इंजिनिअर आहोत असं सांगून लग्नाची मागणी केली. तरुणीनेही त्याला होकार दिला.

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीसोबत बळजबरीनं शारीरिक संबंध; युवकावर गुन्हा दाखल
अमरावती - इंजिनिअर असल्याची बतावणी करून एका तरूणीला तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आला. १ एप्रिल २०२३ ते १ डिसेंबर २०२३ या काळात ही अत्याचाराची मालिका चालली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी ३१ मार्च रोजी आरोपी रितेश आमझरे या २५ वर्षीय युवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी तरुणी ही २०२३ मध्ये अमरावती येथे भाड्याने राहत होती. ती पोलीस भरतीची तयारी करत असताना तिची आरोपी रितेशसोबत भेट झाली. पुढे या दोघांमध्ये मैत्री झाली. त्यामुळे ते एकमेकांशी चांगले बोलत होते. फिर्यादी तरुणी आणि आरोपी हे मागील ३ वर्षापासून सोबत होते. आरोपीने फिर्यादी तरुणीस आपण इंजिनिअर आहोत असं सांगून लग्नाची मागणी केली. तरुणीनेही त्याला होकार दिला. मात्र त्यानंतर आरोपी हा इंजिनिअर नसल्याचे तरुणीला माहिती झाले. तरुणीने याबाबत आरोपी रितेशला विचारले असता मी घरात एकटाच आहे. माझ्याकडे शेती आहे. मी तुझ्याशी लग्न करतो अशी बतावणी केली.
कॅफेमध्ये अत्याचार
आरोपीने एके दिवशी तरुणीला अमरावती शहरातील एका ठिकाणी बोलावून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. मात्र फिर्यादी तरुणीने त्याला नकार दिला. काही दिवसांनी आरोपीने तरुणीला फोन करून धमकी दिली. त्यानंतर गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कॅफेमध्ये बोलावून जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले असा आरोप तरुणीने केला आहे.
दरम्यान, आरोपीने फिर्यादीसोबतचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. अखेर तरुणीने ३१ मार्च रोजी अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.