अमरावतीत तरुणाला आधी कारनं उडवलं मग चाकूनं हल्ला करत केली हत्या

By प्रदीप भाकरे | Published: July 19, 2024 09:48 AM2024-07-19T09:48:19+5:302024-07-19T09:48:58+5:30

रात्री 12:30 च्या सुमारास रोहितला रक्तबंबाळ स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

In Amravati, a young man was first run over by a car, then attacked and killed with a knife | अमरावतीत तरुणाला आधी कारनं उडवलं मग चाकूनं हल्ला करत केली हत्या

अमरावतीत तरुणाला आधी कारनं उडवलं मग चाकूनं हल्ला करत केली हत्या

अमरावती - राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या केडियानगरस्थित महापालिकेच्या उद्यानासमोर एका २५ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास ही थरारक घटना घडली.  

रोहित अमोल मांडळे (25, रा. गोंडपुरा, राजापेठ) असे मृताचे नाव आहे. राजापेठ पोलिसांनी या प्रकरणी चार संशितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी सकाळी 7:30 च्या सुमारास केडियानगर बगीच्या समोरील जागेचा पंचनामा केला. जुन्या वादातून चार ते पाच जणांच्या तरुणांच्या जमावाने दुचाकीने रोहितला जोरदार धडक दिली. महापालिकेच्या या बगीच्याच्या प्रवेशद्वारालगत कोसळल्यानंतर अज्ञात आरोपींनी त्याला चाकूने भोसकून ठार केले.

तक्रारीनुसार रोहितच्या भावाचा वाढदिवस साजरा करण्यात येत होता. त्यासाठी रोहित सह त्याच्या भावाचे 30 ते 40 मित्र एकत्र आले होते. त्यांनी केक देखील सोबत आणला होता. दरम्यान अन्य एक मित्रासोबत बोलत असताना रोहित हा बगीच्याच्या बाहेर आला. तो फोनवर बोलत असतानाच त्याला अज्ञात टोळक्याने दुचाकीने धडक दिली. तो खाली कोसळल्यानंतर त्याचे वर चाकूने सपासप वार करण्यात आले. घटनास्थळी रोहित सह त्याच्या भावाचे मित्र असताना कोणीही मदतीसाठी धावले नाही. रात्री 12:30 च्या सुमारास रोहितला रक्तबंबाळ स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दरम्यान रोहितवर देखील काही गुन्हे दाखल होते. त्यातून त्याची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक शक्यता राजापेठ पोलिसांनी वर्तवली आहे.

Web Title: In Amravati, a young man was first run over by a car, then attacked and killed with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.