सेंटिमेंटल करून पैसे घेतले, मागताच ‘ते’ फोटो पोस्ट केले; शरीरसंबंधांसाठी केली जोरजबरी
By प्रदीप भाकरे | Published: February 10, 2024 01:14 PM2024-02-10T13:14:01+5:302024-02-10T13:14:18+5:30
तक्रारीनुसार, २ मार्च २०२२ मध्ये आरोपी निखिलने त्याच्या आईची तब्येत बिघडल्याचे कारण सांगून तरूणीकडून १० हजार रुपये उसने घेतले होते.
अमरावती: आईची तब्येतीचे कारण पुढे करून एका तरूणीकडून १० हजार रुपये उसने घेण्यात आले. मात्र ते परत मागताच त्याने तिचे त्याच्यासोबतचे फोटो इन्स्टावर पोस्ट केले. याप्रकारामुळे तरूणीची सामाजिक बदनामी झाली. याग्रकरणी, बडनेरा पोलिसांनी पिडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी निखिल ताजवाणी (रा. मध्यप्रदेश) याच्याविरूध्द ९ फेब्रुवारी रोजी दुपारी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ७ फेब्रुवारी रोजी आरोपीने तो फोटो सोशल मिडियावर व्हायरल केला.
तक्रारीनुसार, २ मार्च २०२२ मध्ये आरोपी निखिलने त्याच्या आईची तब्येत बिघडल्याचे कारण सांगून तरूणीकडून १० हजार रुपये उसने घेतले होते. त्यानंतर आरोपी हा नेहमीच फिर्यादीला शारीरीक संबंध ठेवण्याकरीता जबरदस्ती करीत होता. मात्र ती त्याला ठामपणे विरोध करत होती. दरम्यान, तरूणी व आरोपी एका कॅफेमध्ये चहा पिण्याकरीता गेले असता आरोपीने त्याच्या मोबाईलमध्ये ती व तो येत असलेला सेल्फी घेतला होता. काही दिवसानंतर ती त्याला उसनवारी दिलेले पैसे परत मागत होती. तेव्हा आरोपीने तिला तुझ्या आईवडिलांना सांगून तुझी बदनामी करेन, अशी धमकी दिली. त्यामुळे तरूणीने आरोपीसोबत बोलणे बंद केले व पैसे देखील परत मागितले नाही.
दरम्यान, ७ फेब्रुवारी रोजी पहाटे २.३० च्या सुमारास आरोपीने त्याच्या निखिल ताजवानी या इन्स्टाग्राम अकाऊंट आयडीवरून फिर्यादी तरूणीची बदनामी व विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिचा व त्याचा फोटो समाजमाध्यमावर पोस्ट केला. तो फोटो सोशल मिडियावर टाकल्याने तिची मोठी बदनामी झाली. त्यामुळे आरोपीने ती पोस्ट करून आपला विनयभंग केल्याची तक्रार तिने बडनेरा पोलिसांत नोंदविली.