वाहन व जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात; ९ गुन्ह्यांची उकल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 04:58 PM2023-02-28T16:58:07+5:302023-02-28T17:00:08+5:30
रिक्षा व जबरी चोरी गुन्हयांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सदर घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपीत यांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याबात सुचना दिल्या होत्या.
मंगेश कराळे
नालासोपारा - गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी वाहन व जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून नऊ गुन्ह्यांची उकल करून ५ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस आयुक्तालयाचे जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
भाटपाड्याच्या साईराम चाळ येथे राहणाऱ्या सोनू झा (२९) यांची पन्नास हजारांची दुचाकी मेहता चक्कीजवळ, भाटपाडा येथे पार्क केली होती. १८ फेब्रुवारीला रात्री चोरट्यांनी ती चोरून नेली. विरार पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयातील वसई-विरार परिसरात गेल्या काही महिन्यापासुन दुचाकी, रिक्षा व जबरी चोरी गुन्हयांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सदर घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपीत यांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याबात सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने गुन्हे शाखा, युनिट तीनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाव्दारे आरोपी रईस अकबर शेख (२६) याला २१ फेब्रुवारीला ताब्यात घेवुन त्याचेकडे कौशल्यपुर्वक तपास करुन सहा गुन्ह्यांची उकल करत चोरीच्या २ रिक्षा व ७ दुचाकी असा एकुण ४ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तसेच ३ फेब्रुवारीला ग्लोबलसिटीत राहणारे सुशांत शशिकांत चव्हाण (३०) हे फोनवर बोलत पायी अग्रवाल ग्रुप बाजुकडे जात होते. त्यावेळी पतंजली दुकानाच्या समोर पाठीमागुन दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींपैकी एकाने त्यांचे हातातील मोबाईल जबरीने हिसकावुन चोरी करुन पळुन गेले. अर्नाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणव्दारे आरोपी संजु राजु पाटील (२५) आणि आमिर तजम्मुल शेख (२२) या दोघांना २४ फेब्रुवारीला ताब्यात घेतले. आरोपीकडे चौकशी करून तीन गुन्ह्यांची उकल करत गुन्हयात वापरलेले वाहन व जबरी चोरी झालेला १ लाख ३३ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, शिवाजी खाडे, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सागर बारावकर, सचिन घेरे, शंकर शिंदे, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, प्रविण वानखेडे, सागर सोनवणे, गणेश यादव, संतोष चव्हाण यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.