किरकोळ कारणावरुन सहकारी कामगाराची हत्या; आरोपी कामगाराला अटक
By नितीन पंडित | Published: March 27, 2023 05:53 PM2023-03-27T17:53:15+5:302023-03-27T17:53:40+5:30
सोनाळे ग्रामपंचायतींमधील माल्टा खुर्ची कंपनीत शफुउद्दीन राहत हुसेन अन्सारी व मोहम्मद हनिफ इस्माईल असे दोघे कामगार म्हणून काम करीत होते.
नितीन पंडित
भिवंडी : तालुक्यातील सोनाळे येथील एका कंपनीत सहकारी कर्मचाऱ्याकडून ट्रॉलीचा धक्का लागल्याने त्याचा राग मनात ठेवून धक्का लागलेल्या कर्मचाऱ्याने लोखंडी पाईप ने मारहाण केल्याने एक सहकारी कामगाराची हत्या झाल्याची घटना रविवारी घडली आहे . शफुउद्दीन राहत हुसेन अन्सारी ३० मुळ रा.उत्तरप्रदेश असे हत्या झालेल्या कामगाराचे नाव असून या हत्ये प्रकरणी मोहम्मद हनिफ इस्माईल २५ यास भिवंडी तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
सोनाळे ग्रामपंचायतींमधील माल्टा खुर्ची कंपनीत शफुउद्दीन राहत हुसेन अन्सारी व मोहम्मद हनिफ इस्माईल असे दोघे कामगार म्हणून काम करीत होते. रविवारी दोघे कंपनीत काम करीत असताना सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास शफुउद्दीन राहत हुसेन अन्सारी हा सामान वाहतूक करणारी ट्रॉली घेऊन जात होता. अनावधानाने ट्रॉली चा धक्का मोहम्मद हनिफ इस्माईल याला लागला.त्याने त्याचा राग मनात ठेवून शफुउद्दीन यास जाब विचारात शिवीगाळ केल्याने शाब्दिक बाचाबाची झाली.त्यामध्ये मोहम्मद हनिफ इस्माईल याने त्या ठिकाणी पडलेला लोखंडी पाईप घेऊन शफुउद्दीन यास मारहाण केल्याने अधिक रक्तस्राव होऊन शफुउद्दीन बेशुद्ध पडला. तो मरण पावल्याच्या भितीने मोहम्मद हनिफ इस्माईल हा तेथून फरार झाला होता.
या घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो निरी सचिन कुलकर्णी,सहाय्यक पो नीरी मतकर व पो.ह.मोरे,पो.ना. केदार,जाधव,मुकादम हे घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी जखमी अवस्थेतील शफुउद्दीन यास रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.तर हत्या करणारा घटनास्थळावरुन पसार झाला असल्याने पोलिसांनी अनेकांशी बोलून माहिती घेतली.आरोपी उत्तर प्रदेश येथील नवाब - गंज बाराबंकी या मूळगावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले असता भिवंडी तालुका पोलीस पथकाने कल्याण रेल्वे स्थानकात सापळा रचून मोहम्मद हनिफ इस्माईल यास ताब्यात घेत त्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून रात्री उशिरा अटक केली आहे .