भिवंडीत तीन सराईत चोरट्यांकडून रिक्षा दुचाकी सह घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल
By नितीन पंडित | Published: February 22, 2024 06:52 PM2024-02-22T18:52:16+5:302024-02-22T18:52:24+5:30
भिवंडी, मानपाडा डोंबिवली व मालेगांव, नाशिक अशा वेगवेगळ्या परिसरातून चोरी केलेल्या एकूण चार रिक्षा व एक दुचाकी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
भिवंडी: शहरात वाहन चोरीच्या घटना वाढलेल्या असताना शांतीनगर पोलिस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवाईत तिघा सराईत चोरट्यांना अटक करण्यात यश मिळवले असून त्यांच्याकडून चार रिक्षा,सहा दुचाकी व एक मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
शहरातील वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांचा शोध घेण्याचे आदेश पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांनी दिल्यानंतर शांतीनगर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर,गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे, पोलिस हवालदार संतोष मोरे, रिजवान सैय्यद, पोलिस नाईक श्रीकांत धायगुडे, किरण मोहिते, पोलिस शिपाई दिपक सानप, रूपेश जाधव, मनोज मुके, प्रशांत बर्वे यांनी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक मालेगाव येथील संशयित इसम मोहम्मद अरफाद मोहम्मद आरीफ अन्सारी,वय २१,रा. मालेगांव, जि. नाशिक हा भिवंडी परिसरात येऊन रिक्षा चोरी करीत असल्याचे समजले. त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेत त्यांचेकडे कसून तपास केला असता त्याने भिवंडी, मानपाडा डोंबिवली व मालेगांव, नाशिक अशा वेगवेगळ्या परिसरातून चोरी केलेल्या एकूण चार रिक्षा व एक दुचाकी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
दुसऱ्या घटनेत शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील तडीपार असलेला आरोपी मकसुद दस्तगीर अंसारी,वय २२,रा.न्यु आझाद नगर, भिवंडी यास ताब्यात घेवुन त्याच्या कडे केलेल्या तपासात त्याने शांतीनगर,निजामपूर,भिवंडी शहर पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केलेली एकूण चार पाच दुचाकी जप्त करण्यात यश मिळवले आहे. तिसऱ्या घटनेत सराईत गुन्हेगार जुनैद उर्फ गुलाब अहमद मोहम्मद हनीफ शहा, वय २०, रा.गायत्रीनगर यास ताब्यात घेऊन त्याचेकडे केलेल्या चौकशीत त्याने शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले आहे.