काळीज हादरवणारी घटना! मृत मुलीचा पाय थैलीत घेऊन बाप पोलिसांकडे पोहचला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 06:42 PM2022-06-11T18:42:00+5:302022-06-11T18:42:22+5:30
सध्या पोलिसांनी हा पाय चाचणीसाठी लॅबला पाठवला आहे. तर आरोपी सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.
बिहारच्या भोजपूर परिसरात काळीज हादरवणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी थैलीत मुलीचा पाय घेऊन पोलीस स्टेशनला पोहचलेल्या बापाला पाहून पोलीस हादरले. मुलगी वारंवार सांगत होती, बाबा मला इथून घेऊन चला, परंतु मी तिला वाचवू शकलो नाही. जोपर्यंत मी तिच्याकडे पोहचलो तोवर तिची राख झाली होती. केवळ एक पाय वाचला. मुलीच्या पायातील पैजणाने तिची ओळख पटली असं बापाने सांगितल्यावर पोलीस सुन्न झाले.
सध्या पोलिसांनी हा पाय चाचणीसाठी लॅबला पाठवला आहे. तर आरोपी सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सर्व आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. बिहारच्या भोजपूर येथील बभनगावात राहणाऱ्या अखिलेश बिंदने त्यांची मुलगी ममताचं लग्न मे २०२१ मध्ये बरौली गावातील शत्रुघ्नशी केले होते. ममताच्या मामाने हे लग्न लावून दिले होते. मृत मुलीचे वडील गुजरातच्या राजकोट येथे पत्नीसोबत राहायला आहेत. तर मुलगी गावात मामासोबत राहत होती.
मुलीचा पाय घेऊन बापानं पोलीस स्टेशन गाठलं
मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या काही महिन्यानंतर सासरच्या मंडळींनी ममतासमोर १ लाख रुपये मागणी केली. पैसे न दिल्याने तिच्यासोबत मारहाण आणि छळ करण्यात आला. ममताला मागील सोमवारी तिच्या सासरच्या मंडळीने जाळून मारून टाकलं असा आरोप मृत मुलीच्या बापाने केला. त्यांना केवळ मुलीचा एक पाय सापडला. ज्यात त्यांनी दिलेले पैजण होते. त्यानंतर एका थैलीत पाय घेऊन बापाने पोलीस ठाणे गाठलं. माझ्या मुलीला न्याय द्यावा अशी मागणी बापाने केली आहे. बापाच्या तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली आहे.
ममताने तिच्या मामाला सांगितले होते की, तिचा पती आणि सासरचे लोक पैसे मागत आहेत. आम्ही पैसे दिले नाही म्हणून तिला जाळून मारण्यात आले. या प्रकरणी एएसपी हिमांशू यांनी सांगितले की, पती शत्रुघ्न आणि सासरे राम प्यारे बिंदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. सुरुवातीच्या तपासात महिलेची हत्या करून तिचा मृतदेह सोन नदी घाटावर आणला गेला. त्याठिकाणी जाळण्यात आले. डाव्या पायाचा काही भाग वाचला होता. जो वडिलांनी घेऊन पोलीस स्टेशनला आले. या पायाची डिएनए चाचणी करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.