पती, पत्नी और वो..! मुलीच्या हत्येनंतर माहेरच्यांनी पतीच्या घरासमोरच केले अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 03:13 PM2023-07-19T15:13:17+5:302023-07-19T15:26:48+5:30
निशाच्या घरच्यांनी तिच्या मृत्यूला पती मुकेश कुमारचं अफेअर जबाबदार असल्याचे म्हटलं आहे.
गोपालगंज - बिहारच्या गोपालगंज परिसरात एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुलीकडच्यांनी सासरच्यांवर हत्येचा आरोप केला आहे. मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या घटनेनंतर संतप्त माहेरच्यांनी सासरच्या घरासमोरच तिच्यावर अंत्यसंस्कार केला. या प्रकारानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले. बिहारच्या मांझागडच्या आलापूर गावातील ही घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या मृत महिलेचे नाव निशा कुमारी आहे. २२ वर्षीय निशा कुमारी बडहरिया गावातील शंभू प्रसाद यांची मुलगी आहे. निशाचे लग्न माझागड आलापूर रहिवासी डॉ. मुकेश कुमारसोबत झाले. निशाच्या घरच्यांनी सांगितले की, २८ फेब्रुवारीला धूमधडाक्यात मुलीचे लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी निशाला पतीच्या दुसऱ्या अफेअरबाबत समजले. त्यागोष्टीवरून निशा आणि पतीमध्ये सातत्याने वाद होत होता. याबाबत निशाने माहेरच्यांनाही फोन करून सांगितले.
निशाच्या घरच्यांनी तिच्या मृत्यूला पती मुकेश कुमारचं अफेअर जबाबदार असल्याचे म्हटलं आहे. यातून होणाऱ्या वादातून मुकेश पत्नीला मारहाण करत असे. पत्नीचा विरोध त्याने गळा दाबून निशाची हत्या केल्याचा आरोप तिच्या घरच्यांनी केला. या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमसाठी पाठवला. पोस्टमोर्टमनंतर मृतदेह निशाच्या घरच्यांना दिला. परंतु नाराज माहेरच्या लोकांनी निशाचा मृतदेह घेऊन पतीच्या घरासमोरच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर तणाव पाहता पोलिसांची मोठी कुमक घटनास्थळी दाखल झाली. निशाच्या घरच्यांनी पती आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली आहे.