ऐकावं ते नवलच! गंगा नदीत माशांऐवजी सापडतेय दारू; प्रशासन धास्तावले, अधिकारी चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 06:54 PM2022-05-15T18:54:12+5:302022-05-15T18:54:24+5:30
नदीवर ड्रोनमधून ठेवली जातेय नजर; प्रशासकीय अधिकारी अलर्ट मोडवर
पाटणा: बिहारमध्ये दारूबंदी आहे. मात्र यामुळे तस्करांची चांगलीच चांदी झाली आहे. बिहारमधील प्रशासकीय यंत्रणा दारूची तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना दारू माफिया मात्र वेगवेगळे मार्ग शोधून काढत आहेत. माफिया लढवत असलेली शक्कल पाहून पोलीस चकीत झाले आहेत.
बिहारच्या छपरामध्ये दारू तस्करांवर ड्रोननं लक्ष ठेवण्यात आलं. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे दियरा परिसरात असलेल्या नदीत पाणबुडे पाठवण्यात आले. त्यांच्या हाती दारूचा मोठा साठा लागला. तस्करांनी दारूचा मोठा साठा चक्की नदीत लपवल्याची माहिती उघडकीस आली. यामध्ये देशी आणि विदेशी मद्याचा समावेश होता. उत्पादन शुल्क विभागाकडून सातत्यानं नदी परिसरात छापेमारी सुरू आहे. मात्र तस्कर नवनवे मार्ग शोधून काढत आहेत.
तस्कर नद्या आणि तलावांचा वापर दारूचा साठा लपवण्यासाठी करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गंगा नदीत निळ्या गोण्यांमध्ये तस्करांनी दारू लपवली होती. उत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आल्यानं त्यांनी या ठिकाणी तपास केला. त्यावेळी नदीत दारूचा मोठा साठा सापडला.
उत्पादन विभागानं पन्नासहून अधिक गोण्या जप्त केल्या आहेत. ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात असताना काही जणांवर संशय आला. त्यानंतर उत्पादन विभागाच्या पथकानं नदीत जाऊन पाहणी केली. त्यावेळी दारूचा साठा जप्त करण्यात आला. मात्र तस्कर पळून गेले.