स्क्रू ड्रायव्हरने एटीएम फोडणारे दोघे गजाआड, २१ एटीएममध्ये चोऱ्या केल्याची माहिती
By गौरी टेंबकर | Published: April 5, 2023 03:34 PM2023-04-05T15:34:22+5:302023-04-05T15:35:10+5:30
पत्रा तोडून सापडले पोलिसांच्या तावडीत.
मुंबई: बोरिवली पश्चिम परिसरात असलेल्या बँसिन कॅथलिक को ऑपरेटिव्ह बँकेत दोन अनोळखी इसमांकडून स्क्रू ड्रायव्हरने
एटीएम मनी डिस्पेंस पट्टी तोडून त्यातील रोख रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकानी एमएचबी कॉलनी पोलिसात तक्रार दिल्यावर धीरेंद्रकुमार रामदेव पाल आणि अभिषेक रामअजोर यादव यांना बुधवारी अटक करण्यात आली. पोलिसांना पाहून घराचा पत्रा तोडून ते पळण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र अखेर पोलिसांच्या तावडीत सापडले.
तक्रारदार जय फरगोज (३०) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी संध्याकाळी त्यांच्या बोरिवली शाखेतील एटीएम सेंटरचा सुरक्षा रक्षक सुभाष कुमार मातो याने त्यांना कळवले की एटीएममध्ये येणाऱ्या ग्राहकांना व्यवहार होण्यात अडथळा येत आहे. त्यामुळे फरगोज यांनी मशीनचे देखभाल करणारे मंदार सावंत यांना बोलावत त्याची तपासणी करण्यास सांगितली. तेव्हा मशीनमधील पट्टा कोणीतरी तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे असे सावंत यांनी फरागोज यांना सांगितले. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी असलेली सीसीटीव्ही फुटेज ५ मार्च रोजी पडताळले. ज्यात एक ग्राहक एटीएम मध्ये दोन अनोळखी इसम घुसले आणि त्यांनी स्क्रू ड्रायव्हर सदृश्य वस्तूने त्यात छेडछाड करत बाहेर आले.
काही वेळाने हे ग्राहक पैसे काढायला आला मात्र पैसे न निघाल्याने तो परत गेला. तेव्हा छेडछाड करणारी संपूर्ण आत शिरले आणि त्यांनी एटीएम मशीनच्या कॅश विड्रॉवल करण्याच्या ठिकाणी हात घालत त्यातील बेल्ट हाताने खेचून काढला व पैसे आले की नाही याची खात्री करत तिथून पळ काढला. त्यामुळे जवळपास १८ आणि २५ वयोगटातील दोघांवर एम एच बी कॉलनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सचिन शिंदे , सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार, हवालदार शिंदे, खोत, नाईक देवकर, शिपाई सवळी शेरमाळे, मोरे आणि परिमंडळ ११ च्या शिपाई रुपाली डाईंगडे यांनी सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी चोरी करून आरोपी उत्तर प्रदेशला जात असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यांच्यावर लक्ष ठेवत अखेर ठाण्याच्या जय भीमनगरमध्ये पत्र्याच्या झोपडीत लपले होते. त्यावेळी पवार यांच्या पथकाने त्यांच्या झोपडीस चारही बाजूने घेरले. तेव्हा आरोपीने पत्रा तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांनी एम एच बी कॉलनीसह टिळक नगर, तुळीज, मीरा भाईंदर, नालासोपारा, चेंबूर, डोंबिवली या ठिकाणी मिळून २१ एटीएम फोडल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.