बारावीचा पेपर फुटीप्रकरणी ५ जण अटकेत; सायबर सेलेचे पथक मदतीसाठी धावले
By निलेश जोशी | Published: March 5, 2023 11:58 AM2023-03-05T11:58:55+5:302023-03-05T11:59:15+5:30
साखरखेर्डा पोलिसांनी अटक केलेल्यामध्ये दोन खासगी शाळांवरील शिक्षक असून यात प्रसंगी आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.
बुलढाणा - सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरात बारावीचा गणिताच विषय फुटल्याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसानी पाच जणांना अटक केली आहे. सायबर सेलचे एक पथकही या तपासात साखरखेर्डा पोलिसांना मदत करत असून कथितस्तरावर बनविण्यात आलेल्या एका व्हॉट्सअप ग्रुपवरील डिलीट झालेला डाटाही त्यांच्याकडून रिकव्हर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
साखरखेर्डा पोलिसांनी अटक केलेल्यामध्ये दोन खासगी शाळांवरील शिक्षक असून यात प्रसंगी आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गणेश शिवानंद नागरे, पवन सुधाकर नागरे, गणेश बद्रीनाथ पालवे (रा. भंडारी), गोपाल दामोधर शिंगणे (रा. शेंदुर्जन), गजानन शेषराव आढे ( किनगाव जट्टू) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रात्री दरम्यानच त्यांना अटक करण्यात आल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना साखरखेर्डा पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता आहे. तीन मार्च रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात बारावीचा गणिताचा पेपर समाजमाध्यमावर व्हायरल झाल होता. त्यानंतर शिक्षण विभागाची धावपळ झाली होती. विधीमंडळातही हे प्रकरण गाजले होते. प्रकरणी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात शनिवारी पाच परीक्षा केंद्रप्रमख, पेपर रनर बदलण्यात आले होते. सोबतच बुलढाणा येथील केंद्र प्रमुखाला नोटीसही बजावण्यात आली होती.
सायबरचे पथक मदतीला
या प्रकरणात सायबर सेलच्या पथकाची साखरखेर्डा पोलिस मदत घेत असून कथितस्तरावर समाजमाध्यमावर व्हायरल झालेल्या पेपर संदर्भाने एखादा व्हॉट्अप ग्रुप बनवला गेला होता का? त्यात कोणकोण सहभागी होते, या दिशेनेही तपास करण्यात येत आहे. असा एक ग्रुप बनविल्या गेल्याची चर्चा असून संबंधितांनी त्यातील डाटा डिटील केला गेला असल्याची शक्यता गृहीत धरून तो रिकव्हर करण्यासाठी सायबर सेलचे पथक मदत करत असल्याची माहिती आहे. दोन दिवसात त्यादृष्टीने ठोस माहिती समोर येईल असे सायबर सेलच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले.