कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीला संपवलं; हत्येनंतर आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
By देवेंद्र पाठक | Published: February 5, 2023 10:50 PM2023-02-05T22:50:55+5:302023-02-05T22:56:12+5:30
साक्रीत पत्नीचा खून, सलग दुसऱ्या दिवशीही खुनाची घटना घडल्याने जिल्हा हादरला आहे.
धुळे - कौटुंबिक वाद विकोपाला जावून पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाल्याने उपचार घेताना तिचा मृत्यू झाला. ही घटना साक्री शहरातील गवळी वाडा भागात रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेनंतर पतीने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.
किरण पुरूषोत्तम मोरे (वय ३३) असे मयत महिलेचे नाव आहे. तर पुरुषोत्तम नामदेव मोरे (वय ४२) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पतीचे नाव आहे.याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.दरम्यान जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना घडलेलीआहे.
साक्री शहरातील गवळी वाडा भागात पुरुषोत्तम मोरे हे पत्नी किरण सोबत वास्तव्यास होते. त्यांच्यात रविवारी कौटुंबिक वाद झाला. हा वाद विकाेपाला गेला. किरण ही स्वयंपाक करीत असतानाच पुरूषोत्तम याने कांदा चिरण्याच्या चाकूने किरणवर सपासप वार केले. यात ती रक्तबंबाळ होऊन घरातच निपचत पडली. यानंतर त्याने संतापाच्या भरात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना लक्षात येताच परिसरात गर्दी जमा झाली.
पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख पोलिसांच्या फौजफाट्यासह तातडीने दाखल झाले. गंभीर अवस्थेत असलेल्या दोघांना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून किरण हिला मृत घोषित केले. तर तिचा पती पुरुषोत्तम याच्यावर प्राथमिक उपचार करुन अधिक उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे काम साक्री पोलिस ठाण्यात सुरु होते. दरम्यान जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही खुनाची घटना घडल्याने जिल्हा हादरला आहे.