श्रद्धाचे ३५ तुकडे झाले, तुझे ७० करेन; 'लिव्ह इन'मधील युवकाची तरुणीला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 05:02 PM2022-12-02T17:02:47+5:302022-12-02T17:03:09+5:30
या तरुणाचे नाव हर्षल माळी नसून अर्शद सलीम मलिक असल्याचे तिला समजले.
धुळे - श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला असून या हत्येची चर्चा सगळीकडेच सुरू आहे. त्यात धुळ्यात खळबळजनक प्रकार घडला आहे. दिल्लीत श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे झाले, तू आमच्या विरोधात गेली तर तुझे ७० तुकडे करेन अशी धमकी लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवकाने तरूणीला दिल्याचं समोर आले आहे. याबाबत धुळे शहरातील एका २४ वर्षीय तरुणीने पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.
या तरुणीने तक्रारीत म्हटलंय की, मला सक्तीने धर्मांतर करायला लावले, पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचेही धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपी युवकाच्या पित्याने माझ्यावर अनैसर्गिक अत्याचार केले असा गंभीर आरोप तरुणीने केला आहे. गुरुवारी मध्यरात्री देवपूर पश्चिम पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या फिर्यादीनुसार, अर्शद सलीम मलिक नावाच्या 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये राहणाऱ्या तरुणाने २९ नोव्हेंबर रोजी ही धमकी या तरुणीला दिली. जुलै २०२१ पासून हे दोघे एकत्र राहतात. त्याआधी ४ एप्रिल २०१६ रोजी तरुणीचा पहिला विवाह झाला होता. २०१७ मध्ये तिला मुलगा झाला सन २०१९ मध्ये तिच्या पतीचे अपघातात निधन झाले. त्यानंतर तिची हर्षल माळी नावाच्या तरुणाशी ओळख झाली. त्याने लळिंग येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्याची चित्रफीत बनवून तिला धमकावले. त्यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्यावर जुलै २०२१ मध्ये लिव्ह इन रिलेशनशिपबाबत अमळनेर येथे प्रतिज्ञापत्र तयार करायला गेले.
मात्र हे करताना या तरुणाचे नाव हर्षल माळी नसून अर्शद सलीम मलिक असल्याचे तिला समजले. अर्शदने तिला उस्मानाबाद येथे एका फ्लॅटमध्ये नेले. तिथे त्याचा पिता सलीम बशीर मलिक याने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चार महिन्यांनी अर्शदने तिला धुळे शहरातील विटा भट्टी भागातील घरी आणले. २६ ऑगस्ट २०२२ रोजी तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतरही सलीम बशीर मलिककडून तिच्यावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार होतच होते. दरम्यानच्या काळात अर्शदने तिचे धर्मांतर करवून घेतले. तिच्या पाच वर्षांच्या पहिल्या मुलाची खतना करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्याला विरोध केल्यामुळे अर्शदने तिला दिल्लीतील श्रद्धा वालकरच्या बातम्यांची आठवण करून दिली.
श्रद्धाचे तर फक्त ३५ तुकडे केले गेले, तुझे आम्ही ७० तुकडे करू, अशा शब्दात त्याने धमकावले असा धक्कादायक आरोप फिर्यादी ने केला आहे. याप्रकरणी अर्शद आणि सलीम या दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे व या संदर्भात पुढील तपास पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"