प्रेमाचा भयंकर शेवट...! हात-पाय, तोंड बांधून योगा टीचरला ७ फूट खड्ड्यात जिवंत गाडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 17:48 IST2025-03-26T17:48:16+5:302025-03-26T17:48:39+5:30
अपहरणाच्या १० दिवसानंतर जगदीप बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली

प्रेमाचा भयंकर शेवट...! हात-पाय, तोंड बांधून योगा टीचरला ७ फूट खड्ड्यात जिवंत गाडलं
रोहतक - मेरठमधील सौरभ हत्याकांड देशात चर्चेत असतानाच हरियाणाच्या रोहतकमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी पत्नीच्या प्रियकराला मित्रांसोबत मिळून क्रूरपणे जिवंत गाडल्याचा प्रकार घडला आहे. रोहतकच्या बाबा मस्तनाथ यूनिवर्सिटीच्या योगा टीचर जगदीपच्या हत्येचा अखेर ३ महिन्यांनी खुलासा झाला आहे. २४ डिसेंबरला जगदीपची हत्या झाली होती. नुकतेच २४ मार्चला जगदीपचा मृतदेह सापडला. त्याला ७ फूट खड्ड्यात जिवंत गाडण्यात आलं होते.
शहरापासून ६१ किमी दूर नेले अन्...
प्रेम प्रकरणातून योगा टीचरचं अपहरण करून त्यांना शहरापासून ६१ किमी लांब चरखी दादरी येथे नेण्यात आले. त्याठिकाणी ७ फूट खड्ड्यात जिवंत गाडले. अपहरणाच्या १० दिवसानंतर जगदीप बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. ३ महिने पोलीस जगदीपचा शोध घेत होती. त्यानंतर ३ महिन्यांनी २४ मार्च रोजी पोलिसांनी योगा टीचर जगदीपचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला. या प्रकरणी २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हात-पाय, तोंड बांधलं होते
जगदीप बाबा मस्तनाथ यूनिवर्सिटीत योगा टीचर होता. २४ डिसेंबरला सकाळी जगदीप नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेले परंतु संध्याकाळ झाली तरी ते परतले नाहीत. आरोपींनी जगदीपचे हात-पाय आणि तोंड बांधले होते त्यामुळे जगदीपला काहीच करता आले नाही. रोहतकपासून ६१ किमी अंतरावर निर्जनस्थळी आरोपींना ७ फूट खड्डा खणत त्यात जगदीपला जिवंत गाडले. ३ जानेवारीला जगदीप बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. पोलिसांनी ३ महिने तपास केला. त्यानंतर जगदीपच्या कॉल डिटेल्समधून पुरावा मिळून पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या.
जिथं भाड्याने राहत होता, तिथल्या महिलेशी संबंध
कोर्टात आरोपींना हजर केले असता या नवी माहिती समोर आली. जगदीप ज्या घरात भाड्याने राहायचा तिथल्या एका महिलेशी त्याचे अफेअर सुरू होते. ज्याची भनक महिलेच्या पतीला लागली. त्याने जगदीपला मारहाण करत त्याचे अपहरण केले. त्यानंतर मित्रांच्या मदतीने त्याला एका ठिकाणी नेऊन त्याला जिवंत जमिनीत पुरले. तपासावेळी पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेज पडताळले त्यात ४ जण जगदीपला बळजबरीने उचलून घेऊन जात असल्याचं दिसून आले.