पोलिसांचा धाक संपला, भरदिवसा दोन कारच्या काचा फोडून पैशांच्या बॅग लांबविल्या
By सागर दुबे | Published: April 17, 2023 08:55 PM2023-04-17T20:55:22+5:302023-04-17T20:55:30+5:30
चो-यांचे सत्र थांबेना ; एकूण ८७ हजार रूपयांचा ऐवज चोरी
जळगाव : जळगाव शहरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले चोऱ्या व घरफोड्याचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. रात्री नव्हे तर आता भरदिवसा घरफोड्या आणि चो-यांच्या घटना समोर येत आहेत. सोमवारी भरदिवसा शहरातील चित्रा चौक आणि मणियार सुपर शॉपीसमोर उभ्या असलेल्या दोन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी पैशांच्या बॅगा लांबविल्याच्या घटना घडल्या. यामुळे पोलिसांचा उरला सुरलेला धाक संपल्याची प्रचिती जळगावकरांना येत आहे.
शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथील जितेंद्र शालीग्राम भदाणे यांचा गावातच खते व बी-बियाणे विक्रीचा व्यवसाय असून त्यावर त्यांचा उदनिर्वाह चालतो. सोमवारी सकाळच्या सुमारास भदाणे हे त्यांचा मित्र गणेश नवल पाटील (रा. वडगाव ता. जळगाव) यांच्यासोबत (एमएच.१८.बीसी.०२५७) क्रमांकाच्या कारने जामनेर येथे जाण्यासाठी निघाले होते. दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास भदाणे यांनी यांनी कार चित्रा चौकातील रिक्षा स्टॉपजवळ पार्क करून जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले. जेवण आटोपल्यानंतर १.१५ वाजेच्या सुमारास भदाणे हे पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी कारजवळ आले असता, त्यांना कारच्या मागील बाजूच्या दरवाजाच्या खिडकीची काच फोडलेला दिसून आला. तर कारच्या मागच्या सीटवर ठेवलेल्या १० हजार रूपये ठेवलेली बॅग दिसून आली नाही. त्यामुळे त्यांना चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
----
काही मिनिटात दुसरी घटना...रोकड, दागिने नेले...
दुसर्या घटनेत जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील अमोल कारभारी पाटील हा तरुण सोमवारी सकाळी एमएच.४८.पी.९७१० क्रमांकाच्या कारने बहिणीच्या वैद्यकीय तपासणीसाठी जळगावात आला होता. बहिणीची सासू व सासरे हे आडगाव येथून बसने नवीन बसस्थानक येथे उतरले होते. त्यामुळे त्यांनाही सोबत घेवून अमोल हा खासगी रूग्णालयात गेला होता. रूग्णालयातील काम आटोपून दीड वाजेच्या सुमारास ते ड्रायफ्रुट घेण्यासाठी स्टेडीयम परिसरातील मणियार सुपर शॉपीमध्ये आले होते.
दुकानाच्या बाजूलाच अमोल याने कार पार्क केली होती. मात्र, खरेदी करून बाहेर आल्यानंतर त्यांना कारची मागची काच फोडलेली दिसून आली. तर मागच्या सीटवर ४५ हजार रूपयांची रोकड, २५ हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी आणि मोबाईल असलेली बॅग व दुसरी महत्वाचे कागदपत्र असलेली बॅग गायब झालेली दिसून आली. आजू-बाजूला त्यांनी बँगचा शोध घेतला. पण, बॅग चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात येवून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे.