लग्नाच्या एक दिवस आधी पळाली मुलगी; प्रियकरासोबत लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 08:31 IST2025-02-21T08:31:18+5:302025-02-21T08:31:44+5:30
संबंधित प्रकार पोलिसांना कळवण्यात आला. घरच्यांनीही सगळीकडे शोध घेतला परंतु दोघांचा थांगपत्ता लागला नाही

लग्नाच्या एक दिवस आधी पळाली मुलगी; प्रियकरासोबत लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
कानपूर - अलीकडेच कानपूरच्या घाटमपूर येथील एका युवतीने तिच्या लग्नातून पळ काढल्याचं समोर आलं होते. आता ५ दिवसांनी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली आहे. तिच्यासोबत आणखी एका युवकाचा मृतदेहही ताब्यात घेण्यात आला आहे. घाटमपूरच्या सोनीचं १५ फेब्रुवारीला लग्न होते परंतु तिचं नात्याने काका लागणाऱ्या २५ वर्षीय अंकित या युवकाशी मागील काही वर्षापासून अफेअर सुरू होते. हे दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे आणि त्यांना लग्नही करायचं होते.
एकाच गावात शेजारी राहणाऱ्या आणि नात्याने काका असल्याने या दोघांच्या प्रेमात अनेक अडचणी आल्या. आपलं लग्न होणार नाही हे दोघांना माहिती होते. अंकितने याआधीही सोनीला घरातून पळून जाऊ असं म्हटलं होते, परंतु तेव्हा तिने घर सोडण्यास नकार दिला. त्यानंतर या दोघांच्या नात्याची भनक घरच्यांना लागली त्यामुळे सोनीचं लग्न लावण्याची घाई करण्यात आली. १५ फेब्रुवारीला तिचं लग्न होणार होते परंतु १४ फेब्रुवारीला दोघं रात्री घरातून निघून गेले. घरच्यांनी लग्नाची तयारी केली होती. मंडप सजला होता मात्र मुलगीच घरात नव्हती. अंकितही घरात नव्हता हे कुटुंबाला कळलं, त्यामुळे हे दोघे एकत्र पळाले हे सगळ्यांच्या लक्षात आलं.
संबंधित प्रकार पोलिसांना कळवण्यात आला. घरच्यांनीही सगळीकडे शोध घेतला परंतु दोघांचा थांगपत्ता लागला नाही. बुधवारी संध्याकाळी घाटमपूरपासून काही अंतरावर एका मोडकळीस आलेल्या घरात दोघांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या दोघांनी एकत्र आत्महत्या केल्याचं समोर आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवले. या घटनेबाबत दोघांच्या घरच्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. घराच लग्नाचं वातावरण होते, त्यात मुलगी पळून गेली आणि ५ दिवसांनी तिचा मृतदेह सापडला त्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, या दोघांमध्ये काका पुतणीचं नातं होते, परंतु दोघे एकमेकांवर प्रेम करायचे आणि लग्नाच्या एक दिवस अगोदर दोघेही घरातून पळून गेले. प्रेम प्रकरणातून दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. घरच्यांनीही यावर जास्त काही तक्रार केली नाही. मात्र आम्ही सर्व अँगलने या घटनेचा तपास करत आहोत अशी माहिती पोलीस उपअधीक्षक महेश कुमार यांनी दिली.