अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 23:05 IST2024-09-24T23:05:12+5:302024-09-24T23:05:43+5:30
महिला भूमी अभिलेख उपअधीक्षकांच्या अंगावरही ओतले डिझेल, तीन जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
कोरेगाव : साठेवाडी, ता. कोरेगाव येथील घरकुलाच्या जागेची मोजणी करून द्यावी. या मागणीसाठी उत्तम मोरे याने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक लता घरात यांच्या अंगावर डिझेल ओतून ढकलून दिले. याप्रकरणी उत्तम मोरे याच्यासह तीन जणांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा व जिवे मारण्याच्या प्रयत्न प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साठेवाडी, ता. कोरेगाव येथे मुक्ताबाई दादा मोरे यांना रमाई आवास योजनेतून घरकूल मंजूर झाले आहे. या घरकुलासाठी दिलेल्या शासकीय जागेची मोजणी करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास पत्रव्यवहार केला होता. मात्र, या कार्यालयाकडून संबंधित जागेचा सातबारा उतारा व लेआउट पाहिल्यानंतर कमी- जास्त पत्रक झाले नसल्याने मोजणी करता येणार नसल्याबाबतचे पत्र गटविकास अधिकारी कार्यालयात दिले होते. त्याचबरोबर कमी- जास्त पत्रक झाल्याशिवाय मोजणी करता येणार नसल्याचेही कळविले होते.
भूमी अभिलेख उपअधीक्षक लता घरत या पावणेतीन वाजेच्या सुमारास आपल्या दालनातून बाहेर पडत असताना उत्तम मोरे हे दालनामधील खुर्चीवर जाऊन बसले. घरत यांनी मी न्यायालयात साक्ष देण्यासाठी चालले आहे, तेथून आल्यानंतर तुमच्याशी बोलते असे सांगून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, उत्तम मोरे याने मुक्ताबाई मोरे यांच्या कामाचा काय तो आत्ताच्या आता निकाल लावा, असे म्हणत शिवीगाळ करत डिझेल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले व घरत यांच्या अंगावर टाकून ढकलून दिले. त्यानंतर खिशातील काडीपेटी काढून मी स्वतःला पेटवून घेतो, असे म्हणू लागला. त्यामुळे संपूर्ण कार्यालयात खळबळ उडाली.
तिघांविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा
भूमी अभिलेख उपअधीक्षक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोरेगाव पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मुक्ताबाई दादा मोरे, उत्तम व्यंकट मोरे आणि सुमित पद्माकर मोरे, तिघे रा. साठेवाडी, ता. कोरेगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक गणेश माने तपास करत आहेत.