‘लिव्ह इन’मधील महिलेचा प्रियकरानेच चिरला गळा; भिवंडीत दुर्गंधीनंतर घटना उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 06:53 AM2023-09-21T06:53:35+5:302023-09-21T06:53:48+5:30
दोघांनी भिवंडी तालुक्यातील कोनगाव भागात गणेशनगर येथील राजपूत निवासमधील तळ मजल्यावरील खोली भाड्याने घेतली.
भिवंडी : पतीपासून वेगळे होऊन प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेची तिच्या घरातील किचनमध्ये गळा चिरून हत्या झाल्याची घटना कोनगाव येथील गणेशनगर श्याम बागमधील घरात सोमवारी रात्री घडली. तीन दिवसांनी परिसरात दुर्गंधी पसरल्याने हत्येची घटना उघडकीस आली आहे.
तिच्यासोबत राहणारा प्रियकरच महिलेची हत्या करून फरार झाला आहे. याप्रकरणी कोनगाव पोलिस ठाण्यात फरार प्रियकर शबीर (रा. अंबरनाथ) याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. मृत महिला आणि आरोपी शबीर हे अंबरनाथमधील एका कंपनीत कामाला होते. त्यावेळी दोघांची ओळख होऊन ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी भिवंडी तालुक्यातील कोनगाव भागात गणेशनगर येथील राजपूत निवासमधील तळ मजल्यावरील खोली भाड्याने घेतली. तेथे ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. विशेष म्हणजे हत्या झालेल्या महिलेची मैत्रीण तिच्यासोबत राहत होती.
गळा चिरल्यानंतर नसादेखील कापल्या
१५ सप्टेंबरला दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले होते. भांडणात शबीरने धारदार कटरने महिलेचा गळा चिरला, तसेच दोन्ही हाताच्या नसा कापून तिला जागीच ठार मारले. त्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून शबीर त्या ठिकाणहून पळून गेला होता.
मैत्रिणीच्या दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलिस ठाण्यात शबीर विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस पथक आरोपीच्या शोधत परराज्यात गेले असून, लवकरच त्याला ताब्यात घेऊन अटक केली जाईल, अशी माहिती कोनगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी दिली आहे.