"अभिजीत, तुझ्याशी लग्न झालं नाही तर..."; सुसाईड नोट लिहून युवतीनं उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 10:17 AM2024-07-22T10:17:04+5:302024-07-22T10:21:14+5:30
प्रेम प्रकरणातून युवतीनं वाहत्या नदीत घेतली उडी, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात प्रियकराचा उल्लेख
पटना - बिहारच्या मधुबनी इथं एका मुलीचा प्रेमात विश्वासघात झाल्यानं तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्येपूर्वी तिने प्रियकराला पत्रही लिहिलं आणि मोबाईल खाली ठेवून पुलावरून नदीत उडी घेतली. २४ तासानंतरही या मुलीचा मृतदेह सापडला नाही. या मुलीची वाचण्याची शक्यता नाही. सध्या पोलीस आणि एनडीआरएफची टीम मुलीचा मृतदेह नदीपात्रात शोधत आहे.
बलहा गावातील ही घटना आहे. ज्याठिकाणी धौंस नदीच्या पाणीपात्रात प्रचंड वाढ झाली आहे. शनिवारी या नदीवर बनलेल्या पुलावरून नंदिनी नावाच्या युवतीनं नदीत उडी घेतली. उडी घेण्यापूर्वी तिने प्रियकर अभिजीतच्या नावाचं पत्र लिहिलं होतं. पत्रासोबत तिने मोबाईलही पुलावर ठेवला होता. पुलाच्या आसपास उभ्या असणाऱ्या लोकांनी तिला नदीत उडी मारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत युवतीचे उडी घेतली.
लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मोबाईल, पत्र जप्त केले आणि मुलीच्या कुटुंबाला माहिती दिली. नदीचं पाणी जास्त असल्याने मुलीचा अद्याप काही ठावठिकाणा लागला नाही. रविवारी सकाळपासून एनडीआरएफची टीम मुलीचा शोध घेत आहे. मात्र नदीचं पाणी वाहतं असल्याने मृतदेह लांब गेला असल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत १५ तासांहून अधिक काळ उलटला तरीही मुलीचा शोध लागला नाही.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय?
युवतीनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलंय की, अभिजीत, तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं पण तू समजू शकला नाही. माझ्या प्रेमाचा आदर नाही. मी सर्वकाही सोडून तुझ्याकडे आली तरीही तु मला स्वीकारलं नाही. आजपर्यंत केवळ हीच आशा होती एक ना एक दिवस तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील. तुझ्याशी लग्न झाले नाही तर मी मरेन हे मी बोलले होते. आता तुझी नंदिनी खूप दूर निघून जातेय. स्वत:ची काळजी घे, आनंदी राहा. माझ्याकडून जी चूक झाली असेल तिला माफ कर असं तिने पत्रात म्हटलं आहे.