रेल्वे इंजिनिअर झाला सेक्सवर्कर फिदा; लग्नासाठी धरला हट्ट अन् कायमचा जीव गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 08:53 PM2024-01-24T20:53:09+5:302024-01-24T20:54:26+5:30
पोलिसांनी खाकी वर्दीचा धाक दाखवताच चौकशीत तरुणीने धक्कादायक खुलासा केला.
मंदसौर - मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये रेल्वे इंजिनिअरच्या हत्येचा उलगडा करत पोलिसांनी मृताच्या प्रेयसी आणि तिच्या अन्य एका प्रियकराला अटक केली आहे. मृत व्यक्ती त्याच्या प्रेयसीवर वेश्या व्यवसाय सोडून लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता पण प्रेयसी यासाठी तयार नव्हती असं प्राथमिक तपासात पोलिसांना आढळले आहे. रेल्वे इंजिनिअर दिक्षांत पंड्याच्या या बोलण्याने व्यथित होऊन वेश्या व्यवसाय करणाऱ्या प्रेयसीनं अन्य एका प्रियकरासोबत मिळून एक भयंकर कट रचला आणि संधी मिळताच गोळीबार केला. स्वत:ला वाचवण्यासाठी आरोपींनी त्यांचे मोबाईल आणि कपडे जाळले.
या घटनेची माहिती देताना मंदसौरचे एसपी अनुराग सुजानिया यांनी सांगितले की, २१ जानेवारी रोजी रतलाम रेल्वे विभागाचे रेल्वे इंजिनिअर दिक्षांत पंड्या यांचा रक्ताने माखलेला मृतदेह भावगढ पोलिस स्टेशन हद्दीतील खोडाना गावात तलावाच्या काठावर लाल रंगाच्या कारमध्ये सापडला होता. कार आणि त्याच्या शरीरावर गोळीबारीच्या खुणा होत्या. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून खबरीच्या माहितीवरून धोधर येथील तरुणीला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली.
पोलिसांनी खाकी वर्दीचा धाक दाखवताच चौकशीत तरुणीने धक्कादायक खुलासा केला. दिक्षांत गेल्या ६ महिन्यांपासून रतलाममध्ये राहण्यासाठी हट्ट आणि शिवीगाळ करत होता. त्यामुळे मी खूप अस्वस्थ झाली. २० जानेवारीला मी दिक्षांतसोबत नीमचच्या जेतपुरा गावात लग्न समारंभाला गेली होती. तिथे तो रतलामला जाण्याचा हट्ट करू लागला. त्यानंतर मी माझा प्रियकर मोहसिन लालला हा प्रकार सांगितला. त्यानंतर प्लॅननुसार आम्ही दिक्षांतला परवालिया गावी नेले. जिथे मोहसिनने कारमध्ये ४ गोळ्या झाडून दिक्षांतला संपवले. त्यानंतर मी पुरावे मिटवण्यासाठी कपडे, बाईक जाळून टाकली आणि तिथून आम्ही दोघे फरार झालो असं तिने कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सर्व खबऱ्यांना अलर्ट केले त्यानंतर मोहसिन राजस्थानच्या अखेपूरला जात असताना त्याला अटक केली. आरोपी महिला वेश्या व्यवसायात सक्रीय आहे. मोहसिनवर यापूर्वीही अवैध शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांची तस्करी असे गुन्हे दाखल आहेत. सध्या पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर करून कोठडीची मागणी केली आहे असं पोलिसांनी सांगितले.