ज्या मुलीच्या हत्येसाठी बाप-लेकाला झाली जेल; तिलाच जिवंत पाहून गावकरी हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 12:19 PM2023-03-30T12:19:02+5:302023-03-30T12:20:16+5:30
सुनावणीवेळी बाप-लेकानेही हत्येची कबुली दिली त्यानंतर कोर्टाने दोघांना शिक्षा सुनावली
छिंदवाडा - मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या हत्येचा आरोप ठेवत पोलिसांनी पिता-पुत्राला अटक केली. मात्र ज्या मुलीच्या हत्येसाठी बाप-लेकाला अटक झाली ती मुलगी तब्बल ९ वर्षांनी जिवंत उभी झाली. त्यामुळे या प्रकाराचा सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
या मुलीचे म्हणणं होतं की, मी घरच्यांवर रागावून घराबाहेर गेली होती. सध्या मी उज्जैनला राहते. वडील आणि भावाला खोट्या प्रकरणात फसवण्यात आले आहे. मुलीचे वडील १ वर्षाची जेलची शिक्षा भोगून घरी आले परंतु भाऊ अद्याप जेलमध्येच आहे. घरी परतलेल्या युवतीने पोलिसांवर गंभीर आरोप केले. अन्य मृतदेहाला मी असल्याचं भासवून वडील-भावाला हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली.
२०१४ मध्ये झाली होती बेपत्ता
जोपनाला गावातील रहिवासी शन्न उइके यांची १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी २०१४ मध्ये अचानक घरातून बेपत्ता झाली होती. मुलीचा शोध कुटुंबाने घेतला परंतु ती कुठेच सापडली नाही. त्यानंतर तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. या घटनेच्या ७ वर्षांनी पोलिसांनी शन्न उइकेच्या घराजवळ खोदकाम केले. त्यात हाडांचा सापळा आणि बांगड्या मिळाल्या. या प्रकरणी पोलिसांनी बेपत्ता युवतीचा भाऊ सोनूवर हत्येचा आरोप ठेवला. तर वडिलांनी त्याला पोरीला दफन करण्यास मदत केली असं पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं.
सुनावणीवेळी बाप-लेकानेही हत्येची कबुली दिली त्यानंतर कोर्टाने दोघांना शिक्षा सुनावली. १ वर्षांनी बापाला जामीन मिळाला परंतु सोनू अद्याप जेलमध्ये आहे. आता बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी पुन्हा जिवंत घरी आली आहे. तिचे लग्नही झाले. इतक्या वर्षांनी मृत असलेली मुलगी गावात जिंवत समोर आल्याने गावकरीही हादरले. मुलीला पाहून आई बापाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. या घटनेवेळी गावकरी जमा झाले.
या प्रकरणात पोलिसांनी बाप-लेकावर दबाव टाकून हत्येचा गुन्हा कबूल करून घेतला. पोलीस अधिकाऱ्याने गुन्हा रद्द करण्यासाठी २ लाख रुपये मागितले. आम्ही १२१ हेल्पलाईनवर कॉल केला परंतु कुणी मदत मिळाली नाही. त्यामुळे मला आणि मुलाला जेलमध्ये जावे लागले. मी जामीनावर बाहेर आलो मात्र मुलगा अजूनही जेलमध्ये आहे असं बापाने सांगितले. आता या युवतीची डीएनए चाचणी करण्यात येणार असून तो हाडाचा सापळा कुणाचा होता हे शोधणेही पोलिसांसमोर आव्हान आहे.