झोपेतून लेट उठला म्हणून पतीच्या डोक्यात विट मारली; तुकडे करून ड्रममध्ये भरेन अशी दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 16:12 IST2025-03-27T16:12:27+5:302025-03-27T16:12:53+5:30
रविवारी जेव्हा पती दारू पिऊन घरी पोहचला तेव्हा पती-पत्नीत वाद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी पती खूप उशीर झोपून होता.

झोपेतून लेट उठला म्हणून पतीच्या डोक्यात विट मारली; तुकडे करून ड्रममध्ये भरेन अशी दिली धमकी
मेरठ - उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील सौरभ हत्याकांड देशभरात चर्चेत आले. या हत्येत वापरण्यात आलेल्या ड्रमची दहशत अनेकांना बसली आहे. त्यामुळे मेरठमध्ये ड्रमची विक्रीही घटली आहे. त्यातच मेरठमध्ये आणखी एक प्रकार समोर आला. त्यात पती-पत्नीच्या वादात पत्नीने पतीला भयंकर हत्येची धमकी दिली. जर तुझी नाटकं कमी झाली नाही तर तुझे तुकडे करून ड्रममध्ये भरेन अशी धमकी पत्नीने पतीला दिली आहे.
माहितीनुसार, पत्नीने झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यावर विट मारून त्याला जखमी केले. या जखमी पतीचा त्याच अवस्थेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात त्याने पत्नीवर धमकावल्याचा आरोप केला. पत्नीने पतीचे आरोप फेटाळले असून हा वाद आता पोलीस स्टेशनला पोहचला आहे. दिल्लीच्या देहारादून हायवेकडील एका कॉलनीत राहणारा पीडित पती मजुरी करून कुटुंब सांभाळतो. ५ वर्षापूर्वी त्याचे लग्न झाले होते. मात्र दारूच्या व्यसनामुळे घरात कायम पत्नीसोबत त्याचा वाद व्हायचा.
रविवारी जेव्हा पती दारू पिऊन घरी पोहचला तेव्हा पती-पत्नीत वाद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी पती खूप उशीर झोपून होता. पत्नीने त्याला उठवलं तेव्हा पती रागवला. त्यात दोघांमध्ये भांडणे झाली त्यानंतर पत्नीने विट मारत पतीचे डोके फोडले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर पत्नीने पतीला तुझी नाटकं थांबवली नाही तर ब्रह्मपुरी कांडसारखे तुझेही तुकडे करून ड्रममध्ये भरेन अशी धमकी दिल्याचा पतीने आरोप केला. पती याबाबत तक्रार द्यायला पोलीस ठाण्यात पोहचला परंतु त्यानंतर दोघांमधील वाद मिटवण्यात आला.
दरम्यान, पत्नीने पतीकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावलेत. जखमी पतीचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत पती त्याचे नाव बबलू असल्याचं सांगतो. मला सकाळी उठायला उशीर झाला म्हणून पत्नीने विट मारण्याची धमकी दिली. त्यानंतर विट उचलून डोक्यात मारली. त्यानंतर तुझेही तुकडे करून ड्रममध्ये भरेन असं पत्नीने म्हटलं असं या व्हिडिओत पती सांगताना दिसतो.