बंद खोलीत आढळले ५ मृतदेह; शेजाऱ्यांनी सांगितले धक्कादायक कारण, ऐकून सर्वच हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 11:00 AM2023-03-13T11:00:59+5:302023-03-13T11:01:32+5:30
मृत मनोज घरातूनच किराणा दुकान चालवत होता. रविवारी सकाळी एक शेजारी दूध खरेदी करण्यासाठी दुकानावर आला होता मात्र दुकान बंद होते.
बुरहानपूर - मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात रविवारी एक भयंकर घटना उघडकीस आली आहे जी ऐकून सर्वच हैराण झाले. एका खोलीत पोलिसांना ५ मृतदेह सापडले. पत्नी आणि ३ अल्पवयीन मुलीची हत्या करून पतीने स्वत: गळफास घेत आयुष्य संपवले. नेपानगरच्या डवालीखुर्द गावात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.
पोलीस अधीक्षक राहुल कुमार लोढा यांनी सांगितले की, ३५ वर्षीय मनोजने ३२ वर्षीय पत्नी साधना, ३ मुली, त्यात १० वर्षीय अप्सरा, ८ वर्षीय नेहा आणि ३ वर्षीय तन्नूची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेत फासावर लटकला. मनोजचं मानसिक संतुलन बिघडले होते त्याचमुळे त्याने हे कृत्य केले. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट पोलिसांना आढळली नाही असं त्यांनी म्हटलं.
दूध खरेदीला आलेल्या ग्राहकाने पाहिलं...
मृत मनोज घरातूनच किराणा दुकान चालवत होता. रविवारी सकाळी एक शेजारी दूध खरेदी करण्यासाठी दुकानावर आला होता मात्र दुकान बंद होते. शेजाऱ्याने दरवाजा वाजवला, २-३ ग्राहक दुकानाजवळ आले होते. आवाज दिला तरीही घरातून काहीच आवाज बाहेर ऐकायला आला नाही. काही लोकांनी मनोजच्या मोबाईलवर कॉल केला परंतु तो वाजतच राहिला. जेव्हा लोकांनी घरातील खिडकी तोडून खोलीत पाहिले तेव्हा आतील दृश्य पाहून सर्वच हैराण झाले. मनोजचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत होता तर त्याच खोलीत पत्नी आणि मुलींचा मृतदेह जमिनीवर पडला होता.
शेजाऱ्यांनी तातडीने ही माहिती पोलिसांना दिली. सकाळी ९.३० वाजता पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट नाही. परंतु मृतदेह पाहून शनिवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचा अंदाज लावला जात आहे. मनोजच्या शेजाऱ्यांनी म्हटलं की, काही दिवसांपासून मनोजची पत्नी आणि मुले आजारी होती. उपचारानंतरही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. ज्यामुळे मनोजचा स्वभाव चिडचिडा झाला होता. ते घरात किराणा दुकान चालवायचे. तीन मुली शाळेत शिक्षण घ्यायच्या. आजारी असल्याने त्या शाळेत जात नव्हत्या असं सांगण्यात आले.