भाऊ झाला वैरी! युवकाने भावाला आणि काकाला कारने दिली धडक; ४ वेळा चाकाखाली चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 02:03 PM2023-04-28T14:03:11+5:302023-04-28T14:03:29+5:30
अजय गुप्ता त्याची बोलेरो कार घेऊन दोघांचा पाठलाग करत होता. छोटेलाल आणि मुलगा सचिन गुप्ता रस्त्याने जाताना अजयने कारने त्यांना धडक दिली.
सिंगरौली - मध्य प्रदेशच्या सिंगरौली भागात नात्यांमध्येच वैर झाल्याने भाऊ-भाऊ एकमेकांचे शत्रू बनल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका २० वर्षीय युवकावर त्याच्या काकाला आणि चुलत भावाला जीवे मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. निर्दयीपणे युवकाने २ जणांची हत्या केली. युवकाने काका आणि चुलत भावाला त्याच्या कारखाली एकदा नव्हे तर ४ वेळा चिरडले. त्या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.
संपत्तीवरून सुरू होता वाद
छोटे लाल आणि भाऊ इंद्रभान यांच्यात बराच काळापासून वाद सुरू होता. दोघांमध्ये संपत्तीवरून चढाओढ लागली होती. २ दिवसांपूर्वी या दोन्ही भावाचे जोरदार भांडण झाले. त्यात छोटेलालने मुलगा सचिन गुप्तासोबत पोलीस ठाण्यात जात तक्रार नोंदवली. ही बाब इंद्रभानला समजली आणि त्याने त्याचा मुलगा अजय गुप्ताला त्या दोघांचा पाठलाग करायला सांगितले.
भावाला आणि काकाला वाहनाने चिरडले
अजय गुप्ता त्याची बोलेरो कार घेऊन दोघांचा पाठलाग करत होता. छोटेलाल आणि मुलगा सचिन गुप्ता रस्त्याने जाताना अजयने कारने त्यांना धडक दिली. इतकेच नाही तर तब्बल ४ वेळा अजयने या दोघांना कारच्या चाकाखाली चिरडले. यात सचिनचा जागेवरच मृत्यू झाला. तर छोटेलालला स्थानिकांनी रुग्णालयात पोहचवले पण वाटेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर आरोपी अजय गुप्ता फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. दोन्ही मृतदेह पोलिसांनी पोस्टमोर्टमला पाठवले आहेत. अजयने कशारितीने दिवसाढवळ्या त्याचा काका आणि भाऊ दोघांना कारखाली चिरडले हे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. सिंगरौलीच्या कचनी परिसरातील ही घटना आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. सध्या या घटनेतील आरोपी अजय गुप्ता हा फरार असून पोलीस त्याच्या कुटुंबाची चौकशी करत आहेत.