अतिवेग नडला! हायस्पीड कार झाडाला आदळली; २ मित्र दगावले, तिघे वाचले, जखमीवर गुन्हा नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 04:57 PM2023-06-11T16:57:05+5:302023-06-11T16:58:03+5:30
१० जूनच्या मध्यरात्री अंधेरी परिसरात राहणारे ५ मित्र एका कारमधून दादरहून परतत होते.
मुंबई - दादर येथे वेगवान कार झाडाला आदळल्याने त्यातील २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण गंभीर जखमी आहेत. ५ मित्र एका पार्टीवरून अंधेरी येथील त्यांच्या घरी जात होते. तेव्हा ही घटना घडली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णत: चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले तर २ मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले.
पोलिसांच्या माहितीनुसार, १० जूनच्या मध्यरात्री अंधेरी परिसरात राहणारे ५ मित्र एका कारमधून दादरहून परतत होते. यावेळी अतिवेगातील ही कार झाडाला आदळली. या अपघातात सुनील दत्तावाणी, सतीश यादव यांचा मृत्यू झाला तर केविन धनराज पिल्लई, साद अंसारी, सुदर्शन हे गंभीररित्या जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने तिघांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टर म्हणाले. या अपघातासाठी जबाबदार जखमी अवस्थेतील कार ड्रायव्हर सुदर्शनवर पोलिसांनी आयपीसी २७९, ३३८ आणि ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचसोबत त्याच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी लॅबमध्ये पाठवले आहेत.
दुसरीकडे पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गावरही ४ वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या हायवेवर पुण्यावरून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या २ कंटेनर आणि २ बस यांच्यात टक्कर झाली. अपघातात खासगी बस जागेवर पलटली. त्यात ४ जणांचा मृत्यू झाला तर ४ जखमी आहेत. तर इतर २३ प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या.
दरम्यान, हा अपघात इतका भयंकर होता की त्यात चारही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने रस्त्यावरून बाजूला केली. त्यानंतर हायवेवरील वाहतूक सुरळीत झाली.