उंदिरमामानं मार्ग दाखवला अन् मुंबई पोलिसांना १० तोळे सोनं सापडलं; काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 04:15 PM2022-06-16T16:15:23+5:302022-06-16T16:16:32+5:30
या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी प्रसंगावधान राखत तात्काळ तपासाला सुरुवात केली.
मुंबई - शहरातील दिंडोशी परिसरात नाल्यातून तब्बल १० तोळं सोनं पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सोनं मिळवण्यासाठी पोलिसांना चक्क एका उंदिरमामांनी मदत केली आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं ना. पण हे खरं आहे. एका उंदराच्या सहाय्याने पोलिसांनी महिलेला हरवलेले सोनं परत मिळवून दिले आहे. महिलेने भिकारी स्त्रीला कोरडा पाव पिशवीतून दिला. ती स्त्रीने कचराकुंडीत फेकली होती. याच पिशवीत सोन्याचे दागिने होते. ज्याची किंमत ५ लाखांच्या आसपास होती.
मुंबई पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने सोन्याची पिशवी महिलेला ताब्यात दिली आहे. पावाच्या नादात पिशवी फेकली मात्र पोलिसांनी वेळीच यंत्रणा कामाला लावली त्यामुळे महिलेला हरवलेले सोन्याचे दागिने मिळाले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक होत आहे.
नेमकं काय घडलं?
दिंडोशी पोलीस स्टेशन हद्दीतील सुंदरी नावाच्या महिलेला मुलीच्या लग्नाचं कर्ज फेडायचं होतं. त्यासाठी घरातील १० तोळे दागिने गहाण ठेवण्यासाठी ती बॅकेत जात होती. परंतु सुंदरी घरकामाला ज्याठिकाणी जातात तेथील मालकाने तिला सुका पाव खायला दिला. तो पाव तिने नकळत सोन्याच्या पिशवीत ठेवला. त्यानंतर बॅँकेत जाण्यासाठी पुढे निघाली. मात्र वाटेत पावाची पिशवी तिने एका भिकारी महिलेला आणि तिच्या मुलाला दिली आणि बँकेत पोहचली. परंतु त्याठिकाणी सोन्याची पिशवी तिने महिलेला दिल्याचं लक्षात आलं. तीने तातडीने पुन्हा महिला भेटलेल्या ठिकाणी गेली. परंतु भिकारी स्त्री नव्हती. म्हणून सुंदरीने दिंडोशी पोलीस स्टेशनला धाव घेतली.
या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी प्रसंगावधान राखत तात्काळ तपासाला सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा भिकारी स्त्री तिथून निघून जाताना दिसली. पोलिसांनी महिलेला शोधलं असता तिने पाव कोरडा असल्याने पिशवीसह तो कचऱ्यात टाकल्याचं सांगितले. पोलिसांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोध घेतला परंतु पिशवी सापडली नाही. त्यानंतर पोलिसांनी कचराकुंडीजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा उंदिर त्या पिशवीत घुसल्याचं दिसलं. तसेच पिशवीत ठेवलेला पाव खात इकडे तिकडे फिरत होता. पोलिसांनी या उंदराचा पाठलाग केला. तोपर्यंत उंदिर पिशवी घेऊन नाल्यात शिरला. त्यानंतर पोलिसांनी शिताफीने उंदराच्या ताब्यातील पिशवी त्यांच्याकडे घेतली. त्याच पिशवीत सुंदरीचे सोन्याचे दागिने एका पाकिटात असल्याचं दिसून आले.