Nashik: नाशिकमध्ये पतीने स्वत:ला पेटवून घेत पत्नी-सासूला मारली मिठी; मध्यरात्री घडला थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 11:20 IST2025-04-08T11:19:27+5:302025-04-08T11:20:05+5:30
संतप्त झालेल्या केदारनाथ याने स्वत:ला पेटवून घेतले आणि त्याच अवस्थेत स्नेहल आणि सासू अनिता यांना मिठी मारली. यात स्नेहल आणि अनिता शिंदे गंभीर भाजल्या.

Nashik: नाशिकमध्ये पतीने स्वत:ला पेटवून घेत पत्नी-सासूला मारली मिठी; मध्यरात्री घडला थरार
सिन्नर - सासरी वाद झाल्याने माहेरी गेलेल्या पत्नीबरोबरच सासूसोबत वाद घालत पतीने आधी स्वत:ला पेटवून घेतले व त्यानंतर पत्नी-सासूला मिठी मारत त्यांनाही पेटवल्याची धक्कादायक घटना सिन्नर तालुक्यातील सोनेरी गावात घडली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात गंभीर जखमी झालेल्या पतीचा उपचारावेळी मृत्यू झाला आहे तर पत्नी-सासू गंभीर असून त्यांच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मयत पती व त्याच्या ४ मित्रांविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केदारनाथ हांडोरे असं २४ वर्षीय मृत पतीचे नाव आहे. केदारनाथ हांडोरे व स्नेहल शिंदे यांचा गेल्यावर्षी विवाह झाला होता. काही दिवसांपूर्वी स्नेहल आणि केदारनाथ यांच्यात वाद झाला. त्यामुळे स्नेहल तिच्या माहेरी म्हणजे सोनेरी येथे राहण्यासाठी आली होती. रविवारी रात्री १२ च्या सुमारास केदारनाथ हांडोरे व त्याचे मित्र हरिश डुंबरे, कृष्णा थोरात, गणेश थोरात, विशाल तुपसुंदर हे सोनेरी येथे गेले होते. यावेळी स्नेहल आणि तिची आई अनिता यांच्यासोबत केदारनाथने वाद घातला. चाकूचा धाक दाखवत स्नेहलला पळवून नेण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर संतप्त झालेल्या केदारनाथ याने स्वत:ला पेटवून घेतले आणि त्याच अवस्थेत स्नेहल आणि सासू अनिता यांना मिठी मारली. यात स्नेहल आणि अनिता शिंदे गंभीर भाजल्या.
रविवारी रात्री १ वाजता हा धक्कादायक प्रकार घडला. गंभीर जखमी केदारनाथ हांडोरे याला जिल्हा रुग्णालयात तर स्नेहल, अनिता यांना नाशिक इथल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. केदारनाथ हा ९० ते ९५ टक्के भाजल्याने सोमवारी दुपारी उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला तर या घटनेत पत्नी स्नेहल ३५ टक्के आणि अनिता शिंदे ६४ टक्के भाजल्याची माहिती सिन्नर पोलिसांनी दिली.
जखमी पत्नी-सासूचा नोंदवला जबाब
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिन्नर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींचा जबाब नोंदवला. या प्रकरणी मयत केदारनाथ हांडोरे व त्याच्या ४ संशयित मित्रांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा आणखी तपास करत आहेत.