नाशिकमध्ये सावकाराने १० लाखांचे कर्ज देऊन तीन कोटींची मालमत्ता हडपली!
By अझहर शेख | Published: April 17, 2024 02:48 PM2024-04-17T14:48:13+5:302024-04-17T14:56:53+5:30
बंगल्याच्या बांधकामासाठी फिर्यादी जगन्नाथ उर्फ जगन श्रावण पाटील (५०,रा.कर्मयोगीनगर) यांनी देवरे याच्याकडून दहा लाख रुपयांचे कर्ज १०टक्के व्याजदराने घेतले होते.
- संजय शहाणे
इंदिरानगर : अवैध सावकारी करत खंडणीवसूली करणारा संशयित वैभव यादवराव देवरे याच्याभोवती आवळलेला फास आत घट्ट होऊ लागला आहे. तीन कोटी रूपयांची स्थावर मालमत्ता हडपल्याप्रकरणी त्याच्यासह त्याची पत्नी संशयित सोनल वैभव देवरे, साईनाथ निकम, छाया संजय देवरे, महेश गयाजी खैरनार, रेखा पोपटराव जाधव, संजय पोपटराव देवरे, दिनेश प्रकाश पाटील, सीमा नामदेव पवार, मनूमाता आटो केअर खातेदार, गजानन केटर्स खातेदार यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभवविरूद्ध हा पाचवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंगल्याच्या बांधकामासाठी फिर्यादी जगन्नाथ उर्फ जगन श्रावण पाटील (५०,रा.कर्मयोगीनगर) यांनी देवरे याच्याकडून दहा लाख रुपयांचे कर्ज १०टक्के व्याजदराने घेतले होते. पाटील व देवरे हे सटाण्याचे असल्याने दोघांची ओळख झाली होती.२०१८साली पाटील यांनी देवरे याच्याकडून दहा रुपये शेकडा प्रमाणे दहा लाख रुपये व्याजाने घेतले होते. पहिले तीन महिने पाटील यांनी व्याजाचे पैसे दिले त्यानंतर घेतलेले पैसे व व्याज दिलेल्या तारखेला दिले नाही, म्हणून देवरे याने वीस लाख रुपये मागितले. त्याच्या दुसऱ्या दिवशी २० लाखाचे ४० लाख असे व्याजापोटी मागितले. त्याकरिता पाटील यांच्या सिडको येथील ऑफिस देवरे व गणेश जगन्नाथ जाधव यांच्या नावावर सहा ऑगस्ट २०२०साली साठेखत करून घेतले.
देवरेने दंड म्हणून पाटील यांच्या मुलीच्या नावावर असलेले राजसारथी सोसायटीतील घर सोनल वैभव देवरे हिच्या नावावर करून घेतले तसेच ऑफिसचे साठे खत रद्दबाबत करून घेण्यासाठी देवरेने वेळोवेळी ३७ लाख ५० हजार रुपये उकळले. त्यानंतर देवरेने २९ लाख ८५ हजार रुपये व्याज देणे लागते असे सांगितले. ही रकम दिली नाही तर तुमची प्रॉपर्टी लिहून दे असे सांगितले पाटील यांनी १५ लाख रुपये व्याजापोटी देवरे याला दिले. पाटील यांची गावाकडील जमीन, राहते घर, कार्यालय अशी तीन कोटींची स्थावर मालमत्ता व रोख रक्कम घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
खंडणीसाठी मारहाण
देवरे याने पाटील यांच्याकडे ५० लाख रूपयांची खंडणी मागितली. ही खंडणी वसूल करण्यासाठी त्याने त्यांना स्वत:च्या कारमध्ये बसवून पाथर्डी शिवारात रात्रीच्यावेळी घेऊन जात तेथे दमबाजी करून मारहाण केली. पैसे दिले नाही तर तुला येथेच मारून टाकेल अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.