मित्रांसोबत पार्टी करायला गेला अन् घरी परतलाच नाही; 'त्या' युवकाचा मृतदेह सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 11:35 PM2022-11-17T23:35:56+5:302022-11-17T23:36:05+5:30
गोदापात्रात आढळला मृतदेह, घातपाताचा संशय : शवविच्छेदनानंतर होणार मृत्यूचा उलगडा
नाशिक : चौघा मित्रांसोबत गोदापार्क परिसरात बुधवारी (दि.९) मद्य पार्टी करण्यासाठी गेलेला युवक दीपक गोपीनाथ दिवे (२७, रा. राहुलनगर) हा पुन्हा घरी परतलाच नव्हता. त्याचा गंगापूर पोलिसांसह नातेवाइकांकडून कसून शोध घेतला जात होता. दरम्यान, बुधवारी (दि. १६) गोदावरीच्या पात्रात त्याचा मृतदेह संध्याकाळी त्याच्या नातेवाइकांना पाण्यावर तरंगताना आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. नातेवाईकांकडून ओळख पटविण्यात आली असता मृतदेह दीपकचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या मृत्यूबाबत नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. तिडके कॉलनीमधील चांडक सर्कल परिसरातील राहुलनगरमध्ये राहणार दीपक दिवे हा मित्र विजय जाधव याचा फोन आल्याने घरातून बाहेर पडला होता. मात्र तो पुन्हा रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला गेला मात्र नातेवाइकांना तो सापडला नव्हता.
पत्नी दीपाली दिवे हिने गुरुवारी (दि.१०) दिवे बेपत्ता झाल्याची तक्रार गंगापुर पोलीस ठाण्यात दिली होती. यानंतर गंगापूर पोलिसांनी त्याच्या शोध सुरु कला. दरम्यान, गंगापूर पोलिसांकडून त्याच्या त्या सर्व चार मित्रांकडे चौकशी केली जात होती. त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून माहिती घेतली जात होती. दरम्यान, रविवारी (दि.१३) विजय शिवाजी जाधव (३२) याने गंगापूर पोलिस ठाण्याबाहेर विषारी औषधाचे सेवन केले होते. यामुळे त्याचा मृत्यू झाला. विजय हादेखील बेपत्ता दिवेसोबत पार्टीसाठी गोदा पार्कमध्ये होता, यामुळे त्याच्याकडेही पोलिस चौकशी करत होते. त्याने अचानकपणे आत्महत्या केली व दीपकदेखील बेपत्ता असल्याने याप्रकरणात घातपाताचा संशय बळावला होता. पोलिसांनी तपासाला गती दिली.
मृतदेहावर जखमा नाहीत
मृतदेहाच्या कानाजवळ असलेली लहान जखम वगळता शरीराच्या अन्य भागावर कोठेही जखमा आढळून आलेल्या नाहीत. अंगावरील कपडे व कपड्यांमधील वस्तुदेखील तशाच आहेत. यामुळे प्रथमदर्शनी दीपकच्या मृत्यूबाबत काहीही सांगता त नाही. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर याबाबत अधिक स्पष्टता होईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांनी जिल्हा रुग्णालयात सांगितले. गुरवारी (दि.१७) सकाळी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.