दरोड्याच्या तयारीत उत्तरप्रदेशचे चोरटे, पूर्ण टोळीच गजाआड
By योगेश पांडे | Published: November 26, 2023 10:05 PM2023-11-26T22:05:57+5:302023-11-26T22:06:05+5:30
उत्तर प्रदेशातील ही टोळी रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठमोठ्या कटरच्या साहाय्याने हाय टेंशन लाइन, केबल्स इत्यादी कापून त्यांच्या मालवाहू वाहनांतून घेऊन जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर. नवीन कामठी ठाण्यांतर्गत गस्तीदरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी उत्तरप्रदेशातील असून गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी ५ आरोपींना अटक करून शस्त्रास्त्रासह १५ लाख ४४ हजार रुपयांचा माल जप्त केला. ही टोळी कुठेतरी मोठा दरोडा टाकण्याचा तयारीत होती, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
इरशाद अली नौशाद अली (३०), बद्रुद्दीन इदरीस चौधरी (३४), विनोद राजमन गौतम (३२), मोहम्मद शरीफ नुसरत अली (३१) आणि फरियाद अशरफ अली चौधरी (२७), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. सर्व आरोपी उत्तरप्रदेशच्या सिद्धार्थनगर येथील रहिवासी आहेत. युनिट-पाचच्या पथकाला शनिवारी रात्री साडेअकरा वाजता गादा गावाजवळील हनुमान मंदिराजवळ काही संशयित लोक गुन्ह्याची योजना आखत असल्याची खबर मिळाली. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ चाकू, दोरी, मिरची पावडर, ५ मोबाईल, ३ कटर, स्क्रू ड्रायव्हर, एक कार आणि एक कार्गो व्हॅन असा १५ लाख ४४ हजार ६०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक राहुल शिरे, विक्रांत थारकर, आशिषसिंग ठाकूर, प्रमोद वाघ, महादेव थोटे, गौतम रंगारी, रामचंद्र कारेमोरे, रोनाल्डो अँथनी, सुशील गवई, आशिष पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हाय टेंशन लाइन आणि केबल्स होते ‘टार्गेट’
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील ही टोळी रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठमोठ्या कटरच्या साहाय्याने हाय टेंशन लाइन, केबल्स इत्यादी कापून त्यांच्या मालवाहू वाहनांतून घेऊन जाते. एका शहरात चोरी केल्यानंतर ही टोळी रात्रीच दुसऱ्या शहरात पळून जाते. या टोळीतील आरोपींवर नवी मुंबई आणि पुणे येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.