तुरुंगात आता पती-पत्नीसाठी मिळणार ‘खास’ खाेली!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 05:39 AM2022-10-14T05:39:25+5:302022-10-14T05:39:41+5:30
साथीदारासोबत एकटे भेटता येणार; स्वतंत्र खोलीही मिळणार; सरकारचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : तुरुंगातील लोखंडी सळ्या आता वंश वाढविण्याचे साक्षीदार ठरणार आहेत. पंजाब सरकारने घेतलेल्या पुढाकारानुसार, आता तुरुंगात असलेल्या पती किंवा पत्नीला त्यांच्या जीवनसाथीला एकांतात भेटता येणार आहे. त्याच्या ‘त्या’ भेटीसाठी एक स्वतंत्र खोलीही तयार करण्यात येणार अहे.
याचा लाभ घेणारे पहिले कैदी गुरजित सिंग म्हणाले, तुरुंगात मला एकटेपणा वाटत होता. मात्र जेव्हा माझी पत्नी मला भेटायला आली, तेव्हापासून मी आनंदी आहे
पंजाबच्या चार तुरुंगांत सुविधा
n पंजाब सरकारने कारागृहात कैद्यांना त्यांच्या जीवनसाथीसोबत काही काळ एकांतात घालवण्याची मुभा दिली आहे.
n त्यासाठी कारागृहात स्वतंत्र खोली तयार करण्यात आली आहे.
n सध्या इंदवाल साहिब, नाभा, लुधियाना आणि भटिंडा महिला कारागृहांत ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. सर्व कारागृहांत ही सुविधा देण्याची तयारी सुरू आहे.
कोणत्या देशांमध्ये आहे सुविधा?
पंजाब सरकारच्या म्हणण्यानुसार अनेक देशांमध्ये अशा भेटीसाठी परवानगी आहे. यामध्ये अमेरिका, फिलिपिन्स, कॅनडा, सौदी अरेबिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, फ्रान्ससह अनेक देशांचा समावेश आहे.
कुणाला मिळणार
नाही ही सुविधा?
कुख्यात गुन्हेगार, गुंड आणि लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित खटल्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना ही सुविधा मिळणार नाही.
तुरुंग अधिकाऱ्याने सांगितले की, यासाठी कैदी प्रथम तुरुंग प्रशासनाला अर्ज देतो.अर्ज मंजूर झाल्यानंतर चांगल्या वर्तनाच्या कैद्यांना त्यांच्या जोडीदारासोबत दोन तास राहण्याची परवानगी दिली जाते.
यासाठी तुरुंग प्रशासनाने स्वतंत्र खोल्या तयार केल्या असून त्यामध्ये स्वतंत्र डबल बेड, टेबल आणि जोडून बाथरूमही आहे.