लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या महिलेचा प्रियकराकडून खून; थेरगावमध्ये मृतदेह रिक्षात ठेवून पलायन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 08:16 AM2024-09-12T08:16:11+5:302024-09-12T08:16:41+5:30
काही दिवसांपासून विनायक मात्र शिवानीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. या संशयावरूनच त्याने रात्री गळा आवळून तिचा खून केला
पिंपरी (पुणे) प्रवासी वाहतूक करताना झालेल्या ओळखीतून रिक्षाचालकाने 'ती'च्यासोबत 'लिव्ह इन'मध्ये राहण्यास सुरुवात केली. दरम्यान, चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह रिक्षात ठेवून पळ काढला. थेरगाव येथील जगतापनगर येथे बुधवारी (दि.११) सकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
शिवानी सोमनाथ सुपेकर ऊर्फ संतोषी लकमीचंद भुंबक (२७, रा. वडगाव मावळ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मृत महिलेची बहीण शारदा नवीन जोशी (३५, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. विनायक अनिल आवळे (३५, रा. एमएम चौकाजवळ, काळेवाडी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ३५ वर्षीय विनायक विवाहित आहे. मात्र, पत्नी सोबत राहत नसल्याने तो एकटाच राहत असून रिक्षा चालवतो. फिर्यादी शारदा यांची बहीण शिवानी यांच्या पतीचे निधन झाले आहे. तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. तो शिवानी यांच्या आई-वडिलांकडे राहतो, प्रवासी वाहतूक करताना विनायक आवळे याची शिवानीशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर ते 'लिव्ह इन रिलेशन'मध्ये राहत होते. काही दिवसांपासून विनायक मात्र शिवानीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. या संशयावरूनच त्याने रात्री गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तिच्या आई-वडिलांच्या घरासमोर रिक्षात मृतदेह ठेवून तो फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.