पुण्यात लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून एकाचा खून; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2022 09:50 IST2022-10-01T09:49:54+5:302022-10-01T09:50:16+5:30
नऱ्हे येथील घटना, सुनील नलवडे यांना नऱ्हे भागात आणून ठार मारण्याच्या हेतूने जबर मारहाण केली

पुण्यात लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून एकाचा खून; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
धायरी: अज्ञात पाच ते सहा व्यक्तींनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. सुनिल राधाकिसन नलवडे (वय:५४ वर्षे, भैरोबानाला, फातिमानगर, पुणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबत त्यांचा भाऊ सुदाम राधाकिसन नलवडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञात पाच ते सहा व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील नलवडे हे पूर्वी कॅम्प भागात झेरॉक्स मशीन दुरुस्तीचे काम करीत असत. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास नऱ्हे येथील अभिनव कॉलेज रस्त्यावरील आशा पुष्प शाळेजवळ असणाऱ्या विश्व रेसिङंन्सीजवळ एका चारचाकीमध्ये अज्ञात पाच - सहा जणांनी सुनील नलवडे यांना घेऊन आले. त्यावेळी त्या अज्ञात व्यक्तींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. घटनेचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून जखमी अवस्थेत असणाऱ्या सुनील नलवडे यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. मात्र शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना झाली आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी सुनील नलवडे यांच्या पत्नी व मुलाचा मृत्यू झाल्याने ते एकटेच राहत होते. सध्या ते ठिकठिकाणी फिरून झेरॉक्स मशीन दुरुस्ती करीत असत. तसेच त्यांनी काहीजणांकडून कर्ज घेतले असल्याची माहिती मिळत आहे.
नऱ्हे परिसरात आणून केली जबर मारहाण...
सुनील नलवडे यांना नऱ्हे भागात आणून ठार मारण्याच्या हेतूने जबर मारहाण केली. मात्र मुळात ते या भागात राहावयास नव्हते, त्यामुळे त्यांना या भागात आणून मारहाण का करण्यात आली याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. सुनील नलवडे यांचा भाऊ सुदाम हेही गेली पाच वर्षे त्यांच्या संपर्कात नव्हते. त्यामुळे पैश्याच्या व्यवहारातून खून झाला असावा, असा अंदाज बांधण्यात येत आहे.