प्रियकरासोबत मिळून पत्नीनं दिली पतीच्या हत्येची सुपारी; झोपेत असताना गळा दाबला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 11:31 AM2024-06-27T11:31:21+5:302024-06-27T11:34:27+5:30
अनैतिक संबंधातून पत्नीनं तिच्या नातेवाईकांना दिली पतीच्या हत्येची सुपारी, मृतदेह घरच्या छतावरून खाली फेकला
राजस्थानच्या बारा येथे खळबळजनक प्रकार समोर उघडकीस आला आहे. याठिकाणी पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली आहे. पतीला ठार करण्यासाठी पत्नीने सुपारी दिली होती. त्यासाठी सुपारी किलरला १ लाख रुपये दिले होते. सध्या या प्रकरणात पोलिसांनी पत्नीसह ४ आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
२४ जूनला बजरंगनगरला राहणाऱ्या आशिक अहमदने भावाच्या हत्येची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्याने सांगितले की, आम्ही दोघे भाऊ कुटुंबासह छीपाबडोद परिसरात वेगवेगळ्या घरात राहतो. माझा मोठा भाऊ त्याच्या पत्नी आणि मुलासह परिसरात राहतो. रात्री १२ च्या सुमारास भावाच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबासह मी त्याच्या घरी पोहचलो तेव्हा हकीम खान मृतावस्थेत आढळला, त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस रक्त वाहत होते आणि हातदेखील तुटला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमोर्टमला पाठवला. हकीम खान याच्या राहत्या घरी माळ्यावर फारूक हुसैन भाड्याने राहत होता. फारूक हुसैन आणि मृत हकीम खान याची पत्नी रईसा बानो उर्फ राणी यांच्यात प्रेम प्रकरण सुरू होते. पत्नी रईसा बानो हिला फारुकसोबत राहायचे होते त्यामुळे पती हकीम खानला रस्त्यातून हटवण्याचा कट तिने रचला. जवळपास १५-२० दिवसांपूर्वी रईसा आणि तिचा प्रियकर फारुकने हकीमची हत्या करण्यासाठी रईसाचा भाचा आशिफ खान आणि भावाचा जावई रिजवान खान यांना ३ लाख रुपयांची सुपारी दिली.
या चौघांनी हकीमच्या खूनासाठी २२ जूनची रात्र निवडली. परंतु ते त्यात यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आशिफ आणि रिजवान दोघांना फारूक आणि रईसा यांनी हत्या करण्यासाठी घरी बोलावले. त्याच दिवशी संध्याकाळी फारूक त्याच्या मूळ गावी गेला जेणेकरून हकीम खानच्या हत्येचा संशय त्याच्यावर येऊ नये. रात्री ९ वाजता आशिफ आणि रिजवान हे हकीमच्या घरी आले. हकीम घराच्या छतावर झोपला होता. त्यावेळी गळा दाबून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह छतावरून खाली फेकला. पोलिसांच्या तपासात हा सगळा प्रकार उघड झाला त्यानंतर या चारही आरोपींना अटक केली.