संगमनेरमध्ये सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्यांना पकडले
By शेखर पानसरे | Published: July 24, 2023 11:23 AM2023-07-24T11:23:10+5:302023-07-24T11:40:16+5:30
नशेखोरांचा महिला, मुलींना त्रास ; रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू
शेखर पानसरे
संगमनेर : सार्वजनिक ठिकाणी नशा करणाऱ्यांना पोलिसांनी पडकले. संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर आणि परिसरात रविवारी ( दि.२३) संध्याकाळी साडे सात वाजता सुरु झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
संगमनेर शहर आणि परिसरातील सार्वजनिक ठिकाणी नशेखोर नशा करण्यासाठी येतात. याचा त्या-त्या परिसरातील नागरिक, महिला आणि मुलींना त्रास होतो. याबाबत पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी वाघचौरे हे स्वतः कारवाई करताना दिसून आले.
जाणता राजा मैदान, गोल्डन सिटी, प्रवरा नदी परिसर आदी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे, सिगारेट ओढणारे यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम १८५, कलम ८४, कलम ८५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमा खाली कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे आदींचा समावेश होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.