सिनेस्टाईल पाठलाग करून दारूची बेकायदेशीर वाहतूक करणारी जीप पकडली
By Appasaheb.patil | Published: December 16, 2022 02:08 PM2022-12-16T14:08:12+5:302022-12-16T14:08:35+5:30
साडे बाराशे लिटर हातभट्टी दारु जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
सोलापूर - ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारु विरोधात मोहिम राबविण्यात येत असून १५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुळेगाव तांड्यावरुन निघालेल्या जीपचा पाठलाग करुन एक हजार दोनशे साठ लिटर हातभट्टी दारुचा साठा जप्त केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाब्यांवर दारु पिण्याची व्यवस्था करुन देणारे तसेच तेथे बसून दारु पिणा-यांवरही विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान १५ डिसेंबर रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे भरारी पथकाने रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुळेगाव तांडा रोडवर पाळत ठेवली असता मुळेगाव तांड्यातून एक जीप क्रमांक एमएच ०६ डब्लू ६८३७ ही भरधाव वेगाने बोरामणीकडे जात असतांना दिसून आली. या वाहनाला थांबण्याचा इशारा केला असता जीपचालकाने भरधाव वेगाने जीप पळवून लावण्याचा प्रयत्न केला. एक्साईजच्या पथकाने जीपचा सिनेस्टाईल पाठलाग करुन सोलापूर-हैद्राबाद रोड वरील मुळेगाव तांड्याच्या हद्दीतील डाळ मिल समोरील रोडवर जीप पकडली.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे दुय्यम निरिक्षक सुरेश झगडे, सुनिल पाटील, सहायक दुय्यम निरिक्षक गजानन होळकर,जवान प्रकाश सावंत, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट व वाहनचालक मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली.
दोघांवर गुन्हा दाखल, वाहन केले जप्त
जीपची झडती घेतली असता त्यात वाहनचालक धर्मराज अंकुश माने व भगवान देविदास निकम (रा. बक्षी हिप्परगा ता. द. सोलापूर) आढळून आले. दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील १४ रबरी ट्यूबमध्ये भरलेली एक हजार दोनशे साठ लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या वाहनासह एकूण पाच लाख चौसष्ट हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत केला. दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.