न्यायालयाने तो आदेश दिल्यानं आम्ही कारवाई करु शकत नाही; पोलीस अधिक्षकांचं स्पष्टीकरण!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 07:38 PM2022-12-13T19:38:27+5:302022-12-13T19:43:41+5:30
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेत सदर प्रकरणावर महत्वाची माहिती दिली.
गेल्या काही दिवसांआधी जुळ्या बहिणींनी एकाच युवकाशी लग्न केल्याची मोठी चर्चा झालेली पाहायला मिळाली. सोलापूरच्या अतुल आवताडे या तरुणाने एकाच मांडवात दोन सख्या जुळ्या बहिणींसोबत लग्न केले. या लग्नाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यानंतर एकाचवेळी २ मुलींशी लग्न केल्याप्रकरणी नवरदेव अतुल अवताडे चांगलाच अडचणीत आला.
अकलूज पोलीस ठाण्यात अतुलविरोधात तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हे प्रकरण नेले. मात्र आता सोलापूर न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या महत्त्वपूर्ण टिप्पणीमुळे अतुलला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबाबत आज सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेत सदर प्रकरणावर महत्वाची माहिती दिली.
जुळ्या बहिणींशी लग्न केल्यानं पोलिसांत तक्रार दाखल; तरुणावर कारवाई होणार?, जाणून घ्या...!
अतुलविरोधात दाखल झालेल्या तक्रारींनूसार पोलिसांनी न्यायालयात तपास करण्याची परवानगी मागितली असता, न्यायालयाने अदखलपात्र गुन्ह्यात तपास करता येत नाही असे आदेश दिले, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली. न्यायालयात यावर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने पीडित कोण आहे?, असे विचारले. कारण तक्रार करणारा हा पीडित नव्हता. जुळ्या बहिणींपैकी कोणी असेल किंवा संबंधित लग्न करणाऱ्याचे पाहिले लग्न झाले असेल आणि पहिल्या बायकोने तक्रार दिली असेल तर तपास करा, असा आदेश न्यायालयाने दिल्याचं पोलीस अधिक्षकांनी सांगितलं.
अतुल अवताडेने पहिले लग्न केले असेल तर पहिल्या पीडित पत्नीने संबंधित पोलीस ठाण्यात येऊन तक्रार द्यावी. त्यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून, आम्ही न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील तपास करू, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे सध्यातरी अतुल आणि जुळ्या बहिणींना दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
जन्म, बालपण, शिक्षणच काय, तर नोकरीही एकत्रित असा जीवनाचा प्रवास एकत्रित करणाऱ्या रिंकी व पिंकी या जुळ्या बहिणींची ही आयुष्याची गोष्ट. दोघींना एकमेकींची इतकी सवय लागली की, त्या एकमेकींशिवाय राहणे कठीण बनले होते. इतकेच काय, तर एकमेकींची आवड- निवडही एकसारख्याच झाल्या होत्या. कांदिवली येथील रिंकी व पिंकी उच्च विभूषित असून आयटी क्षेत्रात मोठ्या पगारावर नोकरी करणाऱ्या जुळ्या बहिणी. वडिलांच्या पश्चात आईसोबत राहत होत्या.
सहा महिन्यांपूर्वी रिंकी, पिंकी व आई आजारी पडल्या होत्या. यावेळी अंधेरी येथे राहणाऱ्या अतुल या टॅक्सी ड्रायव्हरने तिघींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिघींच्या कुटुंबात पुरुष नसल्याने माणुसकीच्या नात्याने अतुलने तिघींची रात्रंदिवस सेवा केली. यामुळे तिघींना अतुलविषयी आपुलकी निर्माण झाली. यातूनच जुळ्या बहिणींतील एकीचे प्रेम हे अतुलबरोबर जडले, पण दोघींनी एकमेकींना कधीच सोडले नसल्याने त्या विभक्त होऊन राहू शकत नसल्याने दोघींनी अतुलशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"