कोरोना काळात सर्वसामान्यांचे दिवाळं तर चोरट्यांची दिवाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 04:23 PM2022-02-17T16:23:26+5:302022-02-17T16:38:50+5:30
Robbery Case :दोन वर्षात ५५.४४ कोटीच्या मुद्देमालावर डल्ला
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : कोरोनामुळे नोकरी, उद्योगांवर कोसळलेल्या कुऱ्हाडीमुळे सर्वसामान्यांचे दिवाळे निघाले असतानाच, चोरट्यांची मात्र चांदी झाल्याचे समोर आले आहे. अवघ्या कोरोना काळातल्या दोन वर्षात नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून ५५ कोटी ४४ लाखाच्या मुद्देमालावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. त्यापैकी १९ कोटी ३५ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, उर्वरित ३६ कोटी ८ लाखाचा मुद्देमाल चोरटयांनी फस्त केला आहे.
नवी मुंबईत वाढती गुन्हेगारी पोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण करत आहे. शहरात चोरी, घरफोडी, जबरी लूट, सोनसाखळी चोरी अशा घटना दिवसेंदिवस घडत आहेत. त्यामध्ये रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा ऐवज चोरटे पळवत आहेत. त्यात नवी मुंबईतल्या गुन्हेगारांसह शहराबाहेरील टोळ्या सक्रिय आहेत. अनेकदा अशा टोळ्यांच्या मुक्ष्या आवळून पोलीस गुन्हा उघड देखील करतात. मात्र गुन्हेगार हाती लागूनही त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल पुन्हा हस्तगत करण्यात पुरेशे यश मिळत नाही. यामुळे गुन्हेगारांचे शिकार बनलेल्या सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच पडत असते. त्यातच २०२० मध्ये देशात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. काहींच्या उद्योग व्यवसायाला कायमचे टाळे लागले, तर काहींना नोकरी गमवावी लागली. यामुळे आलेल्या नैराश्यातून काहींनी आत्महत्या केल्याच्या देखील घटना नवी मुंबईसह पनवेल परिसरात घडल्या आहेत.
मात्र कोरोनामुळे सर्वसामान्य जरी होरपळला असला तरी, चोरट्यांची मात्र या कालावधीत देखील चांदी झाल्याचे दिसून येत आहे. २०२० मध्ये लॉकडाऊन असतानाही वेगवेगळ्या गुन्ह्यात नवी मुंबईसह पनवेल, उरण मधून तब्बल २५ कोटी १८ लाखाचा मुद्देमाल चोरटयांनी पळवला होता. त्यानंतर २०२१ मध्ये सर्वसामान्यांची गाडी रुळावर येत असतानाच चोरटयांनी देखील गुन्ह्यांचा सपाटा लावला होता. त्यामुळे गतवर्षात नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून ३० कोटी २५ लाखाच्या ऐवजावर चोरटयांनी डल्ला मारला आहे.
२०१९ मध्ये चोरटयांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून २२६० गुन्ह्यात तब्बल २८ कोटी ९२ लाखाचा मुद्देमाल चोरटयांनी लुटला होता. मात्र कोरोनामुळे २०२० मध्ये देखील चोरट्यांकडून हातसफाई सुरु असतानाच २०२१ मध्ये देखील २२६८ गुन्ह्यात तब्बल ३० कोटी २५ लाखाचा ऐवज लुटला आहे.
मुद्देमालाशी संबंधित गुन्ह्यांची उकल करून त्यामधील ऐवज हस्तगत करण्यात पोलीस अपयशी ठरताना दिसत आहेत. गुन्हा उघड होण्यास विलंब झाल्यास, त्या कालावधीत गुन्हेगारांकडून त्या मुद्देमालाची विल्हेवाट लावली जाते. परिणामी त्या गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागत नाही. यामुळेच २०१९ मध्ये ३१.८७ टक्के, २०२० मध्ये ४२.४४ टक्के तर २०२१ मध्ये केवळ २८.६५ टक्के मुद्देमाल हस्तगत झाला आहे.
मालमत्तेचे गुन्हे - २०२१ २०२० २०१९
चोरीला गेला मुद्देमाल - ३०,२५,६३,००६ - २५,१८,३९,२७८ - २८,९२,६२,४३५
हस्तगत केला मुद्देमाल - ८,६६,७७,०६१ - १०,६९,२१,२५१ - ९,२२,०१,७३२
चोरटयांनी फस्त केला - २१,५८,८५,९४५ - १४,४९,१८,०२७ - १९,७०,६०,७०३