अखेर पतीच निघाला पत्नीच्या हत्येचा आरोपी; वडनेर येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक
By विवेक चांदुरकर | Published: January 24, 2024 03:25 PM2024-01-24T15:25:09+5:302024-01-24T15:35:19+5:30
याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, वडनेर भोलजी (खामगाव जि. बुलढाणा) : वडनेर शेत शिवारात २१ जानेवारी रोजी गंगा नितीन कळस्कार यांचा चाकूने वार करून, दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या महिलेचा पतीच आरोपी निघाला असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
गंगा कळस्कार यांची हत्या झाल्यानंतर पती नितीन कळस्कार यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट बोलविले. तपासामध्ये पोलिसांना घटनास्थळी एक चाकू व आरोपीचा दुपट्टा सापडला. पोलिस श्वान रानीला चाकूचा गंध दिला असता मृत महिलेचा पती आरोपी नितीन एकनाथ कळस्कार याचा मार्ग दाखवला. तसेच रुमाल, दुपट्ट्याचा गंध दिला असता आरोपी नितीन कळस्कार याच्याकडेच मार्ग दाखवला. गुन्ह्यातील चाकूही आरोपीच्या घरातील होता. तसेच गुन्ह्याच्या वेळी आरोपीचे मोबाइल लोकेशन घटनास्थळी शेतातच आढळले. तसेच आरोपी शेतात जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून फुटेज मिळाल्याने नांदुरा पोलिसांनी आरोपी मृत महिलेचा पती नितीन एकनाथ कळस्कार (वय ४४) याला अटक केली. पुढील तपास नांदुरा पोलिस करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, एसडीपीओ गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक नागेश जायले, कैलास सुरडकर, मिलिंद जवंजाळ, राहुल ससाने, विनोद भोजने, मानकर झगरे, रविंदर सावले, महिला अंमलदार कल्पना गिरी, दीपाली सुरडकर यांनी केली.