कशेळीतील गणेश कोकाटेच्या खून प्रकरणात म्होरक्यासह दोघे जेरबंद, आठ वर्षांपूर्वीच्या अपमानाचा घेतला बदला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 08:53 PM2023-01-03T20:53:00+5:302023-01-03T20:53:40+5:30
Crime News: कशेळीतील माथाडी कामगारांचा ठेकेदार असलेल्या गणेश कोकाटेची गोळीबार करुन खून करणाºया धनराज तोडणकर आणि त्याचा साथीदार संदीपकुमार कनोजिया या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली
- जितेंद्र कालेकर
ठाणे - कशेळीतील माथाडी कामगारांचा ठेकेदार असलेल्या गणेश कोकाटेची गोळीबार करुन खून करणाºया धनराज तोडणकर (३३, रा. इंदिरानगर, ठाणे) आणि त्याचा साथीदार संदीपकुमार कनोजिया (२७, रा. सुलतानपुर, उत्तरप्रदेश) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी दिली. गणेशने आठ वर्षांपूर्वी मारहाण करीत दिलेल्या अपमानास्पद वागणूकीतून त्याचा खून केल्याची कबूली धनराजने पोलिसांना दिली.
भिवंडीतील कशेळी गावाच्या प्रवेशद्वाराजवळ कोकाटे याच्यावर मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांनी गोळी झाडून हत्या केल्याची घटना ८ डिसेंबर २०२२ रोजी घडली होती. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात हत्यार कायद्यासह खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिस आयुक्त जयजित सिंह आणि सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनीही यातील आरोपींचा शोध घेण्याचे आदेश ठाणे पोलिसांना दिले होते. ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पाच पथकांसह नारपोली पोलिसांकडूनही या प्रकरणाचा तपास सुरु होता. यापूर्वी कोकाटे याच्यावर गणेश इंदूलकर याने माथाडींच्या ठेक्यातील वादातून सप्टेंबर २०२२ मध्ये गोळीबार केला होता. यात तो बचावला होता. या प्रकरणात इंदूलकर वगळता चौघांना गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती. त्यामुळे यावेळीही इंदूलकरनेच गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत होता. प्रत्यक्षात यातील आरोपी वेगळेच असल्याचे सीसीटीव्हीतील चित्रण समोर आले.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे धनराज आणि त्याचा साथीदार संदीपकुमार यांनीच ही हत्या केल्याची माहिती उघड झाली. दरम्यान, धनराज हा ठाण्यातील इंदिरानगर नाका येथे येणार असल्याची माहिती युनिट पाचचे सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) भूषण शिंदे यांना मिळाली होती. त्याचआधारे उपायुक्त पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके, एपीआय शिंदे, अविनाश महाजन, उपनिरीक्षक शिवाजी कानडे, जमादार सुनिल अहिरे, हवालदार जगदीश न्हावळदे, विजय काटकर, अजय फराटे, संदीप शिंदे, विजय पाटील आणि माधव वाघचौरे आदिंच्या पथकाने सापळा रचून प्रत्यक्ष गोळीबार करणारा धनराज आणि मोटारसायकल चालक त्याचा साथीदार संदीपकुमार या दोघांनाही ३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी या खूनाची कबूली दिली.
अपमानाचा घेतला बदला-
कोकाटे याने २०१४ मध्ये धनराजविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या खोटा गुन्हा असल्याचे धनराजचा दावा होता. त्याचवेळी गणेश याच्यासह १० ते १५ जणांनी इंदिरानगर भागात धनराजला अर्धनग्न करीत जबर मारहाण केली होती. याच अपमानास्पद वागणूकीची सल धनराजला होती. याच रागातून गणेशवर गोळीबार करीत त्याचा खून केल्याची कबूली दिली. तोडणकर याच्याविरुद्धही श्रीनगर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असून त्याला एका गुन्ह्यात न्यायालयाने फरार घोषीत केले आहे. गुन्ह्यानंतर ते महाराष्ट्राबाहेर पळून गेले होते. आता या दोघांचाही ताबा नारपोली पोलिसांकडे दिला जाणार असल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांिगतले.