‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या नावाखाली अनेकांची फसवणूक, लातुरात गुन्हा दाखल

By राजकुमार जोंधळे | Published: May 15, 2024 11:49 PM2024-05-15T23:49:48+5:302024-05-15T23:50:08+5:30

एका महिलेसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

In the name of 'Beti Bachao, Beti Padhao', many people were cheated, a case was registered in Latur | ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या नावाखाली अनेकांची फसवणूक, लातुरात गुन्हा दाखल

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या नावाखाली अनेकांची फसवणूक, लातुरात गुन्हा दाखल

लातूर :‘बेटी बचाओ...बेटी पढाओ’ अभियानाच्या नावाखालीअनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार लातुरात बुधवारी सायंकाळी समोर आला. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सांगितले, आरती अक्षय सुरवसे (वय २४ रा. म्हाडा कॉलनी, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, लातुरातील तात्याराव लक्षमण सरवदे, महादेव संतराम सावंत याच्यासह अन्य एका महिलेने संगणमत करुन म्हाडा कॉलनी परिसरात काही महिला, नागरिकांना भारत सरकारच्या ‘बेटी बचाओ...बेटी पढाओ’ या अभियानात पे-टू-पे सोशल फौंउडेशनमध्ये मुलीच्या नावाने ५५० रुपये भरुन सभासद झाल्यानंतर तिच्या लग्नाच्या वेळी १ लाख रुपये मिळतील असे आमिष दाखविले.

शिवाय, याबाबत खोटे सांगून विश्वासघात करुन फिर्यादीसह परिसरातील इतर महिलांची फसवणूक केली. ही घटना बुधवारी उघडकीस आल्याने पैसे भरलेल्या महिला, नगारिकांत एकच खळबळ उडाली. या प्रकाराने संतप्त झालेल्या महिला, स्थानिक नागरिकांनी तिघांनाही पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

५५० रुपयांच्या पावत्याही बनावट?
‘बेटी बचाओ...बेटी पढाओ’ अभियानाच्या नावाखाली ५५० रुपये भरुन घेतल्यानंतर देण्यात येणारी पावतीही बनावट असल्याचा प्रकार समोर आला आहे. किती महिला, नागरिकांकडून या अभियानासाठी पैसे भरुन घेतले आहेत, याचा आकडा चौकशीतून समोर येणार आहे.

एक लाखाचे अमिष; अनेक लागले गळाला...
मुलीच्या लग्नाच्यावेळी एक लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखविण्यात आल्याने अनेक महिला, नागरिक त्यांच्या गळाला लागले. एकाचे पाहून दुसऱ्याने प्रतिसाद देत अनेकांनी पैसे गुंतविल्याचा प्रकार समोर आला. देण्यात आलेल्या पावत्याबाबत काहींना संशय आल्याने अखेर त्यांचे बिंग फुटले. केवळ ५५० रुपयात एक लाख रुपयांचा लाभ मिळणार असल्याने अनेकजण या आमिषाला बळी पडले आहे.

१८० नागरिकांची झाली फसवणूक?
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत १८० जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. चौकशीत हा आकडा वाढण्याची शक्यता पाेलिसांनी वर्तविली आहे. ज्यांची फसवणूक झाली आहे, ते नागरिक समोर येत आहेत. चौकशीसाठी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.  
- वैजनाथ मुंडे, पोलिस निरीक्षक

Web Title: In the name of 'Beti Bachao, Beti Padhao', many people were cheated, a case was registered in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.