शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली हजारो जणांना कोट्यवधींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 11:49 AM2023-01-21T11:49:43+5:302023-01-21T11:50:01+5:30
वडाळा येथील कॉल सेंटर उद्ध्वस्त; ११ जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेअर्समधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत भारतासह परदेशातील दोन ते तीन हजार नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. वडाळा येथे ट्रेड ग्लोबल मार्केटअंतर्गत त्यांचे सुरू असलेले कॉल सेंटरही गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केले आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष-३ने ही कारवाई केली आहे.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून वडाळा येथील अन्टॉप हिल वेअरहाउसमध्ये “ट्रेड ग्लोबल मार्केट” ही मंडळी भारतीय तसेच अमेरिकन नागरिकांना इंटरनेटद्वारे कॉल करायचे. कॉलर ट्रेड ग्लोबल मार्केट या कंपनीच्या वेबसाइटवरून फॉरेक्स शेअर्स करन्सी व कमोडिटी ट्रेडिंग करण्याबाबत यू. के. बेस कंपनीतून बोलत असल्याचे सांगून कॉल सेंटर चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेने छापा टाकून याचा पर्दाफाश केला आहे. आरोपी हे कॉलसेंटरमधून ते यू. के., दिल्ली व मुंबई येथून बोलत असल्याचे भासवून परदेशातील व भारतातील नागरिकांना झॉईपर सॉफ्टवेअरवरून कॉल करून प्रत्येक ग्राहकाला कमीत कमी ५०० ते १००० डॉलर इतकी रक्कम क्रेडिट करायला सांगून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवायचे. पुढे, रक्कम क्रेडिट होताच ती परत न करता फसवणूक करत होते.
विनापरवाना सुरू होता व्यवसाय...
कारवाईदरम्यान ही मंडळी कोणतेही परवाने न घेता, अनधिकृत कॉल सेंटर चालवित असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी आतापर्यंत २ ते ३ हजार ग्राहकांशी संपर्क साधून कोट्यवधी रुपयाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळावरून १५ लॅपटॉप, १ डेस्कटॉप, २ राउटर, ०१ लॅन मशीन व इतर साहित्यासह ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस उपआयुक्त (प्रकटीकरण) प्रशांत कदम, प्रभारी पोलिस निरीक्षक सोपान काकड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी श्यामराव पाटील, सोनाली भारते, समीर मुजावर, आरीफ पटेल, सुधीर पालांडे आणि अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे.