शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला पुण्यातून अटक, शेकडो नागरिकांना घातला गंडा!
By प्रशांत माने | Published: November 29, 2023 04:58 PM2023-11-29T16:58:39+5:302023-11-29T16:58:57+5:30
हा फसवणुकीचा प्रकार जून महिन्यात उघडकीस आला होता.
डोंबिवली: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेवर १० टक्के परतावा देतो असे आमिष दाखवून १५० हुन अधिक गुंतवणूकदारांना चार कोटी ६० लाख ५० हजारांचा गंडा घालणा-या मुख्य आरोपी विनय वर्टी (वय ६८) यांना रामनगर पोलिसांनी पुण्यात सापळा लावून अटक केली. हा फसवणुकीचा प्रकार जून महिन्यात उघडकीस आला होता. यात चौघांविरोधात गुन्हा दाखल होऊन यात तिघांना अटक केली होती पण प्रमुख आरोपीचा शोध सुरू होता.
युनिक कन्सल्टन्सी या कंपनीमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून, संबंधित पैसे शेअरमार्केट मध्ये गुंतवणूक करून गुंतवलेल्या रकमेवर १० टक्के परतावा देतो व एक वर्षात तुमचे गुंतवलेले पैसे डबल करून व सोने देतो. कमी कालावधीत जास्त नफा व सोने मिळवून देतो अशा वेगवेगळया स्किमद्वारे गुंतवणुकदारांना आमिष दाखविले गेले होते. डिसेंबर २०२१ पासून गुंतवणुकदारांनी पैसे गुंतवायला सुरूवात केली होती. सुमारे १५० गुंतवणुकदारांनी एकुण चार कोटी ६० लाख ५० हजार इतकी रक्कम यात गुंतवली होती, परंतु विशिष्ट कालावधीत पैसे न मिळाल्याने तसेच आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच संबंधित गुंतवणुकदारांनी जून महिन्यात रामनगर पोलिस ठाणे गाठत फसवणुकीची तक्रार दिली होती.
पोलिसांनी विनय वर्टी यांच्यासह अन्य तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. आरोपींपैकी गिता तळवडेकर (वय ६५), दिव्य सिंग (वय ४४) आणि नारायण नाईक ( वय ६६) अशा तिघांना अटक केली होती. पण मुख्य आरोपी विनय वर्टी हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. त्यांचा शोध घेणेकामी वरीष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक बळवंत भराडे, गणेश जाधव यांची पथके गठीत केली होती. दरम्यान विनय वर्टी यांना पुणे सावित्रीबाई फुले, विदयापीठ गेट समोर शुक्रवारी सापळा लावून अटक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली.
आरोपीला ४ डिसेंबरपर्यंत कोठडी
आरोपी विनय वर्टी यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.