चार वर्षांपूर्वी हरवलेल्या अर्चनाच्या शोधात सापडले खुनाचे तीन आरोपी, गुन्हा उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2023 12:00 AM2023-05-26T00:00:41+5:302023-05-26T00:00:53+5:30
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा व गोबरवाही पोलिसांनी संयुक्तरित्या केली.
- देवानंद नंदेश्वर
भंडारा : तुमसर तालुक्यातील कवलेवाडा येथील अर्चना माणिक राऊत (२३) ही तरुणी चार वर्षांपूर्वी हरवली असल्याची तक्रार होती. तिचा खून करणारे तीन आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा व गोबरवाही पोलिसांनी संयुक्तरित्या केली.
संजय चित्तरंजन बोरकर (४७), राजकुमार उर्फ राजू चित्तरंजन बोरकर (५०, दोघेही रा. कवलेवाडा) व धरम फागू सश्याम (४२, मोहगाव टोला) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दि. २० एप्रिल २०१९ पासून अर्चना राऊत हरवली आहे, अशी तक्रार तिचे वडील माणिक नत्थू राऊत यांनी गोबरवाही पोलिस ठाणे येथे दिली होती. अर्चना नेहमीप्रमाणे संजय बोरकर याच्या घरी कामावर गेली होती. परंतु, नेहमीप्रमाणे ती घरी परत आली नाही. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी संजय बोरकर याच्या घरी जाऊन चौकशी केली असता, त्यांनी ती दुपारीच गेल्याचे सांगितले.
परंतु, मुलीची चप्पल त्याच्या घराच्या मागच्या दरवाजाजवळ व पिवळ्या रंगाचा दुपट्टा दोरीवर लटकलेला पाहिला. त्यावर अर्चनाच्या आईने त्यांना चप्पल व दुपट्ट्याबाबत विचारले असता, तिच्यावर संजयने ओरडून आपल्या घरी निघून जाण्यास बजावले व घरी जाण्यास भाग पाडले होते. चार वर्षांनंतर स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा व गोबरवाही पोलिसांनी या तक्रारीवरून तपास केला. अर्चनाच्या खुनाचे तीन आरोपी पकडण्यात यश आले.