स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केली होती नाकाबंदी, मुलुंडमध्ये सापडले दोन कोटींचे एमडी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 08:07 AM2024-08-15T08:07:12+5:302024-08-15T08:08:03+5:30
नवघर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवत एकाला अटक केली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी सध्या ठिकठिकाणी नाकाबंदी करून तपासणी सुरू केली आहे. याच नाकाबंदीदरम्यान मुलुंडमधील ऐरोली टोलनाक्यावर दोन कोटी रुपये किमतीचा एमडीचा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे. नवघर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवत एकाला अटक केली आहे.
मुंलुंड येथील ऐरोली टोल नाका येथे मुंबईत प्रवेश करणारी एक कार नाकाबंदीवर असलेल्या पोलिस पथकाने अडवली. तपासणीत वाहनामध्ये संशयित पिवळसर रंगाच्या पावडरचा साठा आढळला. अमली पदार्थ चाचणी किटच्या साह्याने तपासणी करताच ती पावडर एमडी असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत माहिती मिळताच नवघर पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी दाखल झाली. यावेळी कारचालक मोहम्मद कलीम सलीम चौधरी (२७) याच्याकडून २ किलो २९ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. या साठ्याची किंमत दोन कोटी दोन लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.