दोन दिवसांत २५ लाखांच्या बदल्यात सव्वा कोटींचे आमिष, मध्यप्रदेशातील तरुणाची फसवणूक
By योगेश पांडे | Published: May 4, 2023 05:35 PM2023-05-04T17:35:39+5:302023-05-04T17:36:08+5:30
पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली असून इतकी मोठी रक्कम अनोळखी व्यक्तींच्या हाती देण्याअगोदर फिर्यादीने चाचपणी का केली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपूर : अवघ्या दोन दिवसांत २५ लाख रुपयांचे सव्वा कोटी रुपये करून देण्याचे आमिष दाखवत मध्यप्रदेशातील एका तरुणाची ठकबाज त्रिकुटाने फसवणूक केली. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली असून इतकी मोठी रक्कम अनोळखी व्यक्तींच्या हाती देण्याअगोदर फिर्यादीने चाचपणी का केली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आकाश प्रमोद उमरे (२७, लांजी, जि. बालाघाट, मध्य प्रदेश) याला मित्र व नातेवाईकांच्या माध्यमातून नागपुरातील पराग मोहोड या व्यक्तीची माहिती मिळाली. पराग मोहोड (३०, अवस्थीनगर, मानकापूर) हा गुंतवणूकीसाठी पैसे घेऊन ते दुप्पट करतो अशी त्यांना माहिती मिळाली होती. आकाशने परागशी संपर्क केला व त्याच्या सांगण्यावर मित्रासह नागपुरात आला. परागने कंचन गोसावी (३०) या सहकाऱ्याशी सदर येथील पूनम चेंबर्स येथे भेट करवून दिली.
दोघांनीही त्याला दोन दिवसांत २५ लाखांचे सव्वा कोटी रुपये करून देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्या जाळ्यात आकाश फसला व तो २ फेब्रुवारी रोजी परत नागपुरात आला. त्यानंतर आरोपींनी त्याची भेट परवेज पटेल (४०, हसनबाग) याच्याशी करवून दिली. हसनबाग येथील बिलाल एंटरप्रायजेस येथे ती भेट झाली होती. ८ एप्रिल रोजी त्याने परवेज पटेलला त्याच्या कार्यालयात २५ लाख रुपये दिले. आकाशने दोन दिवसांनी आरोपीला फोन केला असता त्याने अजून नफ्यासह पैसे मिळाले नसल्याचे सांगून टाळाटाळ केली.
आकाश परवेजच्या कार्यालयातच गेला असता तेथे परवेजने शिवीगाळ केली व परत आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर आकाशने नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपींविरोधात फसवणूक तसेच धमकीचा गुन्हा दाखल केला. यातील पराग मोहोडला पोलिसांनी अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे.