बागेतून तब्बल १५ हजार लिंबू चोरीला; शेतकऱ्यांनी ५० जण ठेवले राखणीला, अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 03:38 PM2022-04-14T15:38:45+5:302022-04-14T15:45:44+5:30
शेतकऱ्यांनी चोरी रोखण्यासाठी रोजंदारीवर ठेवले राखणदार; दिवसाचा खर्च २२ हजार
आंब्याचा हंगाम सुरू असताना भाव मात्र लिंबू खाऊन जात आहे. सध्या देशभरात लिंबांच्या दराची सर्वाधिक चर्चा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात घाम आल्यावर अनेकजण लिंबू सरबत पिणं पसंत करतात. मात्र सध्या लिंबूचा दर ऐकून अनेकांना घाम फुटला आहे. लिंबाचे दर इतके वाढलेत की आता त्याची चोरी होऊ लागली आहे. उत्तर प्रदेशातील कानपुरात अशीच एक घटना घडली आहे. बिठूर येथील बागेतून १५ हजार लिंबू चोरीला गेले आहेत.
बिठूर येथे गंगेच्या किनारी भागात लिंबाचं उत्पादन घेतलं जातं. लिंबाचे दर वाढल्यापासून चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे आता लिंबांच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांनी रखवालदार तैनात केले आहेत. लिंबाच्या बागेची रखवाली करण्याचं काम ५० जणांवर सोपवण्यात आलं आहे. या रखवालदारांना ४५० मुजरी दिली जाते. त्यामुळे रखवालदारांवर दररोज होणारा खर्च २२ हजार ५०० रुपयांच्या घरात जातो.
याआधी शाहजहापूर आणि बरेलीत लिंबांची चोरी झाल्याच्या घटना घडल्या. बरेलीच्या डेलापीर मंडईतून गेल्या रविवारी रात्री ५० किलो लिंबू चोरीला गेले. तर शाहजहापुरातील बजरिया भाजी मंडईतून ६० किलो लिंबू चोरट्यांनी लंपास केले. यासोबतच चोरट्यांनी ४० किलो कांदे आणि ३८ किलो लसूणदेखील लांबवला.
बिठूर पोलीस ठाण्यात बुधवारी अभिषेक निषाद यांनी लिंबू चोरीबद्दल एफआयआर दाखल केला. गेल्या ३ दिवसांत १ एकरमधून जवळपास १५ हजार लिंबू चोरीला गेल्याची तक्रारी अभिषेक यांनी नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू केला. तर अभिषेक यांनी बागेतच मुक्काम ठोकला आहे. लिंबू पूर्ण पिकेपर्यंत ते बागेतच राहणार आहेत.