संतापजनक! अल्पवयीन तरुणाला बेदम मारहाण; पाय चाटायला लावले; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 17:44 IST2022-04-19T17:41:35+5:302022-04-19T17:44:01+5:30
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल; पोलिसांकडून ८ जणांना अटक

संतापजनक! अल्पवयीन तरुणाला बेदम मारहाण; पाय चाटायला लावले; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
रायबरेली: उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जगतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर एका तरुणानं पीडित मुलाला पाय चाटायला लावले. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आठ आरोपींना अटक केली आहे.
प्राथमिक तपासाच्या आधारे आठ जणांना अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात केल्याची माहिती क्षेत्राधिकारी अशोक सिंह यांनी दिली. या प्रकरणी एससी एसटी कायद्याच्या कलम १४७, १४९ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगतपूरमध्ये वास्तव्यास असलेल्या एका दलित विद्यार्थ्याच्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ १० एप्रिलचा आहे. त्या दिवशी दलित अल्पवयीन मुलाचा एक मित्र त्याच्या घरी गेला. मित्रानं त्याला दुचाकीवरून रामलीला मैदानात नेलं. फिरायला जाऊ सांगून मित्रानं त्याला दुचाकीवरून एका बागेत नेलं.
बागेत काही तरुण उपस्थित होते. त्यांनी दलित तरुणाला मारहाण केली. त्याला बराच वेळ बसवून ठेवलं. मग एका तरुणानं पीडित मुलाला पाय चाटायला लावले. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पीडित तरुणानं आईसह पोलीस ठाणं गाठलं आणि तक्रार नोंदवली.