वसईत पत्नीने प्रियकराच्या मदतीने प्रेमात अडथळा ठरलेल्या पतीचा काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 04:52 PM2023-04-04T16:52:36+5:302023-04-04T16:54:25+5:30

३० मार्चला रात्री सुनील कुमार मुन्नीलाल दुबे (३२) याचा वाघराळपाडा पहाडीवरून खाली पडल्याने मृत्यू झाला होता.

In Vasai, the wife removed the thorn from her husband who had become an obstacle in love with the help of her lover | वसईत पत्नीने प्रियकराच्या मदतीने प्रेमात अडथळा ठरलेल्या पतीचा काढला काटा

वसईत पत्नीने प्रियकराच्या मदतीने प्रेमात अडथळा ठरलेल्या पतीचा काढला काटा

googlenewsNext

मंगेश कराळे

नालासोपारा :- वाघराळपाडा पहाडीवरून खाली पडल्याने ३० मार्चला एकाचा अपघातात मृत्यू झाल्या प्रकरणी वालीव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र तपासादरम्यान हा अपघात नसून हत्या असल्याचा उलगडा पोलिसांनी केला आहे. या हत्येप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करून आरोपी प्रियकराला अटक केली आहे तर फरार पत्नीचा शोध घेत पुढील तपास व चौकशी करत आहे.

३० मार्चला रात्री सुनील कुमार मुन्नीलाल दुबे (३२) याचा वाघराळपाडा पहाडीवरून खाली पडल्याने मृत्यू झाला होता. सुनील कुमार याला दारूचे व्यसन असल्यामुळे त्या नशेत त्याचा तोल जाऊन तो खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी वालीव पोलिसांनी ३१ मार्चला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. सुनीलकुमारचा मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनसाठी पाठवला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्व्हे यांना संशय आल्याने तपास अधिकाऱ्याला योग्य चौकशी करण्यासाठी सांगितले. पोलीस तपासात हा अपघात नसून हत्या असल्याचे उघडकीस आणले. त्या गुन्ह्याचा वेगवेगळ्या दृष्टीने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुनील कुमार यांची पत्नी मुन्नीदेवी दुबे (२९) हिचे परिसरातील संजय कुमार चंदेश्वर प्रसाद (२४) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. प्रेम संबंधात पतीचा अडथळा व त्रास होत असल्यामुळे मुनी देवी हिने संजय कुमार याच्या मदतीने त्याचा काटा काढण्याचे ठरवले. घटनेच्या दिवशी संजय कुमारने सुनील कुमारला वाघराळपाडा पहाडीवर नेले. त्याठिकाणी त्याला दारू पाजून नंतर पहाडीवरून खाली ढकलून दिले. त्यानंतरही सुनील जिवंत असल्याचे लक्षात आल्यावर आरोपी संजयने दोरीने त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली होती. 

वालीव पोलिसांनी सोमवारी दोन आरोपी विरोधात हत्या व हत्याचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी संजय कुमारला अटक केली आहे. आरोपीला वस‌ई सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- चंद्रकांत जाधव (सहाय्यक पोलीस आयुक्त)

Web Title: In Vasai, the wife removed the thorn from her husband who had become an obstacle in love with the help of her lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.