पत्नीचा कारनामा ऐकून पोलीस झाले हैराण; १० लाखात पतीची किडनी विकून केला मोठा कांड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 10:42 IST2025-02-03T10:42:06+5:302025-02-03T10:42:43+5:30
काही दिवसांनी बाहेर जाते म्हणून सांगून पत्नी घराबाहेर पडली, ती परतलीच नाही असं पतीने पोलिसांना सांगितले.

पत्नीचा कारनामा ऐकून पोलीस झाले हैराण; १० लाखात पतीची किडनी विकून केला मोठा कांड
पती-पत्नी यांच्यात प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं असतं असं म्हणतात, परंतु पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात घडलेल्या एका प्रकारानं सगळ्यांनाच हैराण केले आहे. याठिकाणी पत्नीने पतीची किडनी १० लाखांना विकून प्रियकरासोबत पळून गेली आहे. मुलीच्या शिक्षणासाठी पैशांची जमावजमव करा असं पत्नीने पतीला सांगितले. त्यानंतर पैशासाठी पत्नीने पतीला त्याची किडनी विकण्यास भाग पाडले. सध्या या प्रकारामुळे पतीची झोप उडाली असून त्याने फसवणूक करणाऱ्या पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
पतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, मागील १ वर्षापासून पत्नी माझ्यावर किडनी विकण्यासाठी दबाव आणत होती. किडनी विकून मिळणाऱ्या पैशातून घरची परिस्थिती सुधारेल आणि १२ वर्षीय मुलीच्या शिक्षणासाठी चांगल्या शाळेत प्रवेश मिळेल असं ती सांगायची. पत्नीच्या वारंवार दबावामुळे मी किडनी विकण्यास तयार झालो. त्यानंतर एका खरेदीदारासोबत कंत्राट केले. मागील महिन्यात सर्जरी करून मी घरी आलो. पत्नीने मला लवकर बरे होण्यासाठी आराम करण्याचा सल्ला देत बाहेर न पडण्याची सूचना केली असं त्याने पोलिसांना सांगितले.
त्यानंतर काही दिवसांनी बाहेर जाते म्हणून सांगून पत्नी घराबाहेर पडली, ती परतलीच नाही. त्यानंतर कपाटात ठेवलेले १० लाख रूपये आणि काही सामानही गायब असल्याचं पतीच्या निदर्शनास आले. पतीने मित्र आणि नातेवाईकांकडे तिचा शोध सुरू केला तेव्हा ही महिला बॅरकपूरच्या एका घरात सापडली. त्या घरात तो व्यक्तीही सोबत राहायचा ज्याच्यासोबत ती पळून गेली होती. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यावेळी संबंधित महिलेची फेसबुकवर एका युवकाशी मैत्री झाली होती, ती मागील १ वर्षभरापासून त्या युवकाच्या प्रेमात आहे. या दोघांमध्ये अफेअर सुरू असल्याचं तपासात पुढे आले.
दरम्यान, जेव्हा पती, सासू आणि मुलगी बॅरकपूरच्या घरी गेली तेव्हा महिलेने बाहेर येण्यास नकार दिला. पती आणि सासूने मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचा आरोप करून घटस्फोट देईल असं महिलेच्या प्रियकराने धमकी दिली असंही पतीने पोलिसांना सांगितले आहे.